‘काँटे की टक्कर’ असे वर्णन होत असलेल्या ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीला गुरुवारी सुरुवात झाली. आज, शुक्रवारी निकाल जाहीर होतील.
 ६५० सदस्यांच्या प्रतिनिधी सभागृहात (हाऊस ऑफ कॉमन्स) कोणाला बहुमत मिळते याकडे सर्व युरोपाचे लक्ष लागून राहिले आहे. बहुमत मिळवणाऱ्या पक्षाला राणी एलिझाबेथ सरकार स्थापनेसाठी पाचारण करेल व २७ मे रोजी नवीन सरकार सत्तारूढ होईल.  सत्ताधारी हुजूर पक्ष आणि विरोधी मजूर पक्ष यांच्यात या निवडणुकीत अटीतटीची लढत होत आहे. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षासमोर सत्ता राखण्याचे कडवे आव्हान आहे. तर एड मिलिबँड यांनी मजूर पक्षाला पुनश्च गतवैभव प्राप्त करून देण्याचा चंग बांधला आहे. ब्रिटनच्या या निवडणुकीत अनिवासी भारतीय मतदारांची भूमिका मोलाची असेल. एकूण पाच कोटी मतदारांपैकी सहा लाख १५ हजार अनिवासी भारतीय मतदार आहेत. ५० हजार मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासून रांगा लावल्याचे दृश्य होते. ब्रिटनमधील स्थानिक वेळेनुसार सकाळी सात ते रात्री दहापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. डेव्हिड कॅमेरून यांनी मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे तर मिलिबँड यांनीही केलेल्या मतदानाचा पश्चात्ताप होणार नाही, याचा विचार करूनच मतदान करावे, असे आवाहन केले आहे.