उत्तर प्रदेशातील गोरखपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ४३ टक्के तर फुलपूर मतदारसंघात ३७.३९ मतदान झाले. मतदान सुरुवातीपासूनच संथगतीने होते. मतदान शांततेत पार पडल्याचे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे या पोटनिवडणुकीत भाजप विरोधात सप व बसप एकत्र आले आहेत. त्यामुळे निवडणूक निकालावर राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरेल असे मानले जाते.

मतदाना दरम्यान काही ठिकाणी मतदान यंत्रे खराब झाल्याच्या तक्रारी होत्या, मात्र ती तातडीने बदलण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कडक सुरक्षा व्यवस्थेत हे मतदान झाले. १४ मार्चला मतमोजणी होणार आहे. भाजपला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावल्यानंतर केला. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष नकारात्मक राजकारण करत असल्याची टीका आदित्यनाथ यांनी केली. गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांनी तर फुलपूरमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्याने या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.

पाटणा: बिहारमधील अररिया लोकसभा मतदारसंघात ५७ टक्के तसेच जेहानाबाद व बभुआ या दोन विधानसभा मतदार संघात अनुक्रमे ५० आणि ५४ टक्के मतदान शांततेत  झाले. राष्ट्रीय जनता दलाचे मोहम्मद तस्लीमुद्दीन यांच्या निधनाने अर्नियात पोटनिवडणूक झाली. त्यांचे पुत्र सर्फराज आलम यांच्याविरोधात भाजपचे प्रदीपकुमार सिंह यांच्यात लढत होती. जेहानाबादमध्ये राजद व संयुक्त जनता दलामध्ये सामना होता. ही जागा पूर्वी राजदकडे होती. बभुआ मतदारसंघात भाजपच्या रिंकी पांडे व शंभु सिंह यांच्यात लढत होती. येथे भाजप उमेदवाराच्या निधनाने पोटनिवडणूक झाली. मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा भाजप आघाडीत आल्याने या निकालाबाबत उत्सुकता आहे.

बिहार भाजपच्या अध्यक्षांविरुद्ध एफआयआर

अररिया : बिहारमधील अररिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथितरीत्या प्रक्षोभक भाषण करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांच्याविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. राजदचा उमेदवार या निवडणुकीत विजयी झाल्यास अररिया हे आयसिसकरिता आश्रयस्थान ठरेल, असे ९ मार्चला भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी नरपतगंज येथे आयोजित जाहीर सभेत राय म्हणाले होते.