येथील सर्वच भागांत ऐन दिवाळीत हवेची प्रदूषण पातळी कमालीची वाढली असून ती रात्रीतून अति वाईट पातळीकडे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीत फटाके उडवण्याचे प्रमाण जास्त असून त्यात बाहेर पडणारा धूर प्रदूषण वाढण्यास कारण ठरत आहे. या प्रतिकूल हवामान व पिकांचे अवशेष जाळण्यातूनही प्रदूषण होत आहे.

विषारी धुरक्याचा एक पातळसा थर  दिल्लीवर सकाळपासून दिसत आहे. एकूण हवा प्रदूषण निर्देशांक रविवारी सकाळी नऊ वाजता ३१३ होता तो दुपारी अडीच वाजता ३४१ झाला. नंतर तो वाढतच चालल्याचे दिसत आहे. शनिवारी दिल्लीचा हवा प्रदूषण निर्देशांक ३०२ होता, तो सर्वात वाईट प्रकारात मोडतो. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत प्रदूषणकारी फटाके वाजवण्यावर बंदी घातली होती व हरित म्हणजे पर्यावरणपूरक फटाके वाजवण्याचा आदेश दिला होता. या हरित फटाक्यांना फार कमी प्रतिसाद मिळाला असून ते मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांच्या किमतीही अधिक आहेत. हरयाणा व पंजाबमध्ये गेल्या वर्षीप्रमाणेच पिकांचे अवशेष जाळले जात आहेत.