News Flash

चिंताजनक! प्रदूषणामुळे भारतात वर्षभरात २५ लाख लोकांचा मृत्यू

प्रदूषणामुळे होणारे २८ टक्के मृत्यू भारतात

संग्रहित छायाचित्र

भारतातील प्रदूषणाची चिंताजनक स्थिती अधोरेखित करणारी आकडेवारी समोर आली आहे. २०१५ मध्ये भारतात प्रदूषणामुळे तब्बल २५ लाख जणांचा मृत्यू झाल्याचे ही आकडेवारी सांगते. वायू आणि जल प्रदूषणामुळे अकाली मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचे लान्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकाच्या अभ्यासातून समोर आले आहे. २०१५ मध्ये जगभरात प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे ९० लाख लोकांनी प्राण गमावला. यातील २८ टक्के लोक भारतीय होते. या आकडेवारीहून देशातील प्रदूषणाची समस्या भीषण असल्याचे दिसून आले आहे.

‘लान्सेट’ने जगभरातील देशांमधील प्रदूषण, त्याचा लोकांवर परिणाम आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचा अभ्यास केला. यामध्ये देशातील हवा (वायू) आणि पाणी किती प्रदूषित आहेत, याचा आढावा घेण्यात आला. हवा आणि पाणी यामधील प्रदूषण कोणत्या देशात, किती जणांच्या जीवावर बेतले, याबद्दलची आकडेवारी नियतकालिकाने प्रसिद्ध केली आहे. यातूनही भारतातील जल आणि वायू प्रदूषणाची स्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले. २०१५ मध्ये भारतात, वायू प्रदूषणामुळे १८ लाखांहून अधिक जणांनी जीव गमावला. तर जल प्रदूषण जवळपास ६ लाख लोकांच्या जीवावर बेतले.

मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रदूषणाशी संबंधित कारणांमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. औद्योगिकरणात झपाट्याने वाढ होणाऱ्या भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, मादागास्कर, केनिया यासारख्या देशांमध्ये प्रदूषणाची समस्या अतिशय तितक्याच झपाट्याने वाढत असल्याचे ‘लान्सेट’चा अहवाल सांगतो. २०१५ मध्ये भारतात २५ लाख लोकांना प्रदूषणामुळे झालेल्या आजारांमुळे जीव गमवावा लागला. यानंतर या यादीत चीनचा क्रमांक लागतो. चीनमध्ये प्रदूषणामुळे मृत्यू पावलेल्या लोकांचे प्रमाण १८ लाख इतके आहे. हृदयाशी संबंधित आजार, फुफ्फुसांचा कर्करोग यासारख्या आजार या मृत्यूंसाठी कारणीभूत ठरले आहेत.

लान्सेटकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ४० हून अधिक प्रख्यात लेखकांचा सहभाग होता. जगभरात वायू प्रदूषण सर्वाधिक जीवघेणे ठरत असल्याचे या अभ्यासातून समोर आले. वायू प्रदूषणामुळे २०१५ मध्ये जगभरात ६५ लाख लोकांनी जीव गमावला. तर जल प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १८ लाख इतकी आहे. याशिवाय कामाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणामुळे ८ लाख लोकांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 8:00 am

Web Title: pollution kills 9 million people each year india tops with 2 5 million says study
Next Stories
1 मनरेगाचा ८८ टक्के निधी निम्म्या वर्षांतच खर्च
2 नवाझ शरीफ, मुलगी व जावई यांच्याविरुद्ध पाकिस्तानी न्यायालयात आरोप निश्चित
3 निर्मला सीतारामन यांनी अंदमान-निकोबार येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली
Just Now!
X