उत्तराखंड अल्पसंख्याक आयोगाचे बडतर्फ करण्यात आलेले अध्यक्ष सुखदेव सिंह नामधारी यांना त्यांच्या उत्तराखंड येथील घरातून दिल्ली पोलिसांनी पॉण्टी चढ्ढाप्रकरणी शुक्रवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले. नवी दिल्लीतील छत्तरपूर फार्म हाऊस येथे परस्परांवर करण्यात आलेल्या गोळीबारांत चढ्ढाबंधू मरण पावले होते. त्या वेळी नामधारी तेथे हजर होते. त्यांना शुक्रवारी उधमसिंहनगर जिल्ह्य़ातील बाजपूर येथील त्यांच्या घरातून दिल्ली पोलिसांनी अटक करून चौकशीसाठी दिल्लीला आणले आहे. त्यामुळे या सर्व प्रकारात नामधारी यांची नक्की भूमिका काय होती, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या शनिवारी नामधारी आणि त्यांच्या माणसांनी मद्यसम्राट पॉण्टीला वादग्रस्त फार्म हाऊसवर ताबा मिळविण्यासाठी मदत केली होती, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. मालमत्तेच्या वादावरून उद्भवलेले भांडण शिगेला पोहोचल्यानंतर हरदीप आणि पॉण्टीच्या साथीदारांनी एकमेकांवर गोळीबार केला. त्यात हरदीप आणि पॉण्टी हे दोघे भाऊ मरण पावले.