करोना व्हायरसचा सामना अवघं जग करतं आहे. जगभरातली धर्मस्थळं बंद करण्यात आली आहेत. व्हॅटिकन सिटीमध्ये असणारं ख्रिश्चन धर्मियांचं प्रमुख धर्म स्थळ असणारं सेंट पीटर स्क्वेअरही त्याला कसा अपवाद असेल? या ठिकाणी येणं हे अत्यंत पवित्र मानलं जातं. मात्र करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या ठिकाणीही कुणी फिरकत नाहीये. एक भयाण शांतता पोप फ्रान्सिस यांनी सेंट पीटर स्क्वेअरवर अनुभवली. आज ते या ठिकाणी एकटेच उभे राहिले होते.

” मी एक गडद संकटाची छाया इथल्या चौकांमध्ये, रस्त्यांवर आणि शहरांमध्ये अनुभवतो आहे. हे संकट जीवघेणं आहे. जी शांतता मी अनुभवतो आहे ती भयाण आहे. काळजाचा ठोका चुकवणारी आहे.” असं पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं आहे.

पोप फ्रान्सिस हे या सेंट पीटर्स स्क्वेअरच्या पायऱ्या चढत होते त्यावेळी तिथे चिटपाखरुही नव्हतं. एरवी या ठिकाणी अनेक लोकांची वर्दळ असते. मात्र करोनाच्या संकटामुळे हे ख्रिश्चनांचं हे प्रमुख धार्मिक स्थळही रिकामं झालं आहे. पोप फ्रान्सिस यांनी करोनाची तुलना एखाद्या वादळाशी केली आहे. लवकरच सगळं काही सुरळीत होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपण सगळेच या संकटाचा सामना करतो आहोत. लॉकडाउनही पुकारण्यात आला आहे. लवकरच या संकटाचे काळे ढग दूर होतील आणि सारं निरभ्र होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. www.bangkokpost.com ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

 

इतिहासात पहिलाच प्रसंग असेल ज्यावेळी पोप पीटर फ्रान्सिस हे सेंट पीटर स्क्वेअरवर एकटेच उभे होते. त्यांनी एकट्याने प्रार्थना केली. एरवी या ठिकाणी लोकांची ये-जा सुरु असते. तीन प्रसंगांमध्ये हा सेंट पीट स्क्वेअर हजारो लोकांनी गजबजलेला असतो. पोप निवडले जातात तेव्हा, ख्रिसमस असतो तेव्हा आणि ईस्टर असतो तेव्हा. हे तीन मुख्य प्रसंग संपूर्ण जगाला ठाऊक आहेत. मात्र एरवीही या ठिकाणी लोक नाहीत असं चित्र कधीच नसतं ते या करोनाच्या संकटात पाहण्यास मिळालं.