गोरगरिबांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याच्या निर्णयावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. पोप फ्रान्सिस यांनी आज यासंदर्भातील निर्णय जाहीर असून येत्या ४ सप्टेंबरला मदर तेरेसा यांना संतपदाची पदवी देण्यात येईल. रोमन कॅथलिक चर्चच्या कार्डिनल्सकडून या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली.
तेरेसा यांनी आपल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ या संस्थेमार्फत गरीब, अनाथ आणि गरजूंची निरलसपणे सेवा केली. या कार्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. पोप जॉन पॉल (द्वितीय) यांच्या काळात २००३ मध्ये तेरेसा यांना संतपदाने सन्मानित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. संतांबाबत चर्चचे खास कायदे आहेत. त्यानुसार एखादी व्यक्ती कितीही संतासारखे जीवन जगलेली असली तरी तिला संत मानता येत नाही. त्यासाठी तिच्या खात्यावर किमान दोन चमत्कारांची नोंद असावी लागते. तेरेसा यांचा पहिला चमत्कार सिद्ध झाल्याचे व्हॅटिकन चर्चने २००२ मध्ये जाहीर केले होते. तेरेसा यांनी विविध विकारांनी त्रस्त असलेल्या एका बंगाली महिलेला, तर एका ब्राझिलियन व्यक्तीला बरे केल्याचे व्हॅटिकनने म्हटले आहे.