पोप फ्रान्सिस यांचे आवाहन
यंदाच्या ख्रिसमसवर हिंसाचाराच्या काही घटनांची छाया असताना आपण चंगळवाद सोडून साधी समतोल मूल्ये अंगीकारली पाहिजेत असे
आवाहन रोमन कॅथालिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी ख्रिसमसच्या संदेशात केले आहे. जगात १.२ अब्ज कॅथॉलिक ख्रिश्चन आहेत.
बॅसिलिकातील सेंट पीटर्स येथे ख्रिश्चनांच्या प्रचंड मेळाव्यात बोलताना त्यांनी सांगितले की ख्रिश्चन बांधवांनी आधुनिक समाजातील अत्याचारांविरोधात संयमित मार्गाने प्रयत्न करावेत, आजचा समाज चंगळवाद, विलासवाद, संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन व उधळपट्टी, आत्मप्रीतीवाद यांच्या मागे लागून हिंसाचाराच्या दिशेने जात आहे त्यामुळे साध्या व समतोल तसेच सातत्यपूर्ण तत्त्वांचा अंगीकार करणे गरजेचे आहे. जगात ख्रिश्चनांचे भवितव्य भीतीच्या छायेत आहे, काहींना सण साजरा करण्यापासून वंचित ठेवण्यात आले. जग नेहमी पाप्यांच्या विरोधात निर्दयी राहिले पण पापाच्या बाबतीत कनवाळू राहिले. आपण देवाच्या इच्छेखातर लोकांमध्ये न्यायाची भावना रूजवली पाहिजे. यावर्षी युरोपात लाखो निर्वासित सीरिया व इतर काही देशातून आले आहेत त्या स्थितीत सर्वानी करूणा, सहवेदना व दयेसाठी प्रार्थना करावी असेही ते म्हणाले.