जगात ख्रिश्चनांच्या ज्या हत्या होत आहेत त्याबाबत एकप्रकारे अपराधी शांतता बाळगण्यात येत आहे; म्हणजे ख्रिश्चनांच्या हत्यांकडे दुर्लक्ष करून समाजही अपराधात सामील होत आहे, अशी टीका पोप फ्रान्सिस यांनी गुड फ्रायडे निमित्त आयोजित मोठय़ा मिरवणुकीच्यावेळी केली. काल सायंकाळी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आले, त्यानिमित्त दु:ख व्यक्त करण्याचा कार्यक्रम झाला.
मध्यपूर्व, आफ्रिका व जगात इतरत्र ख्रिश्चनांच्या ज्या हत्या केल्या जात आहेत त्याबाबत आम्हाला चिंता वाटते, असे पोप फ्रान्सिस यांनी सांगितले. आजही आपल्या बंधूंना ठार केले जाते, शिरच्छेद केला जातो व सुळावरही दिले जाते पण आपण मात्र शांतपणे उघडय़ा डोळ्यांनी हे पाहत आहोत, हे अपराधात सामील असल्यासारखेच आहे. काही तासांपूर्वीच केनिया विद्यापीठात इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत पोप यांनी निषेध व्यक्त केला होता.
याच वर्षी २१ कॉप्टिक ख्रिश्चनांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. मध्यपूर्वेत काही ठिकाणी नाताळच्या सणावेळी ख्रिश्चनांवर पळून जाण्याची वेळ आली. धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा प्रसार जगभर झाला पाहिजे असे सांगणारी प्रार्थना या वेळी करण्यात आली. शोक मिरवणुकीत सामील झालेल्यांमध्ये अनेक भाविकांचा समावेश होता.