ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस या वर्षी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असून इस्लामिक राष्ट्रांतील हा त्यांचा पहिलाच दौरा ठरणार आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जहाजबांधणीमंत्री कामरान मिशेल यांच्यातर्फे पोप यांना निमंत्रण दिले आहे. सध्याच्या पाकिस्तान मंत्रिमंडळात मिशेल हे एकमेव ख्रिश्चन मंत्री आहेत.

पोप फ्रान्सिस यांनी हे निमंत्रण स्वीकारले असून त्यांच्या इतर दौऱ्यांच्या तारखा निश्चित झाल्यावर पाकिस्तान भेटीची तारीख ठरविण्यात येणार असल्याचे संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. या दौऱ्यात पोप पंतप्रधान नवाझ शरीफ आणि राष्ट्रपती मामनून हुसेन यांची भेट घेणार आहेत. ते अल्पसंख्याक ख्रिश्चन समाजाशी व्यापक चर्चा करणार आहेत. तसेच, पाकिस्तानमधील काही चर्चला ते भेट देतील. पाकिस्तानच्या धार्मिक कायद्यांवर टीका केल्याबद्दल २०११ मध्ये तत्कालिन अल्पसंख्याकमंत्री शाहबाझ भाटी यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पोप यांची ही भेट सकारात्मक ठरेल, अशी सर्वानाच अपेक्षा आहे.