पोप फ्रान्सिस यांनी एका महिलेची माफी मागितली आहे. व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स स्कवेअरमध्ये बुधवारी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना पोप फ्रान्सिस यांनी आपला संयम सुटल्याची कबुली देत महिलेची माफी मागितली.

नेमकं काय घडलं?
मंगळवारी रात्री सेंट पीटर्स स्कवेअरमध्ये लोकांची गर्दी जमली होती. त्यावेळी पोप फ्रान्सिस जमलेल्या लोकांना भेटत होते. त्यांच्याशी हस्तांदोलन करत होते. या दरम्यान बॅरिकेडच्या मागे थांबलेल्या एक महिलेने जबरदस्तीने पोप फ्रान्सिस यांचा हात पकडला व त्यांना आपल्या दिशेने खेचत होती. त्यामुळे पोप फ्रान्सिस यांचा संयम सुटला.

त्या महिलेकडून हात सोडवण्यासाठी पोप फ्रान्सिस यांनी त्या महिलेच्या हातावर चापटी मारली. महिलेच्या या कृतीने पोप फ्रान्सिस चांगलेच संतप्त झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी हे दृष्य नेमके आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठया व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपली मते मांडली आहेत.

त्या घटनेवर पोप फ्रान्सिस काय म्हणाले ?
“अनेकवेळा आपला संयम सुटतो, मी सुद्धा याला अपवाद नाही. त्या वाईट उदहारणासाठी मला माफ करा” असे पोप फ्रान्सिस बुधवारी म्हणाले.

नेटकरी काय म्हणाले?
पोप यांचाही संयम सुटतो असे एका युझरने म्हटले आहे.
शेवटी पोप सुद्धा एक माणूस आहे. तुम्हाला कोणी अशा प्रकारे खेचले तेव्हा तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे रिअॅक्ट होऊ शकता. त्या महिलेची सुद्धा चूक आहे असे दुसऱ्या युझरने म्हटले आहे.