बीबीसीच्या माहितीपटात गौप्यस्फोट

पोप जॉन पॉल द्वितीय यांचे जन्माने पोलंडच्या असलेल्या अमेरिकी तत्त्वज्ञ महिलेशी तीस वर्षे फार निकटचे संबंध होते, असे बीबीसीच्या एका माहितीपटात दाखवण्यात आलेल्या अप्रकाशित पत्रांमधून स्पष्ट झाले आहे. व्हॅटिकनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, की पोप जॉन पॉल द्वितीय यांची अनेक महिला व पुरुषांशी मैत्री होती, त्यामुळे कुणी धक्का बसल्यासारखे काही वाटून घेण्याचे कारण नाही. ते १९७८ ते २००५ दरम्यान पोप होते व मृत्यूनंतर त्यांना संत घोषित करण्यात आले.

दिवंगत पोप जॉन पॉल द्वितीय यांनी ही पत्रे अ‍ॅना तेरेसा टायमिनेका हिला पाठवली होती. ती बीबीसीच्या माहितीपटात दाखवण्यात आली. नॅशनल लायब्ररी ऑफ पोलंड येथे अनेक वर्षे ही पत्रे ठेवण्यात आली होती. पोप जॉन पॉल द्वितीय यांचा २००५ मध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी मृत्यू झाला होता. त्यांनी ब्रह्मचर्याची शपथ मोडली होती, पण त्यांच्या काही पत्रांचा निर्देश हा त्या महिलेशी असलेल्या संबंधांशी अंगुलिनिर्देश करणार आहे. त्यांची मैत्री १९७३ मध्ये सुरू झाली, त्या वेळी टायमिनेका यांनी पहिल्यांदा पोप यांच्याशी संपर्क साधला होता. पन्नास वर्षे वयाची महिला एका पुस्तकावर चर्चा करण्याच्या निमित्ताने अमेरिकेहून पोलंडला आली होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांना प्रतिसाद दिला तेव्हा ते पोप नव्हते तर कार्डिनल होते. सुरुवातीला त्यांची पत्रे औपचारिक होती, पण नंतर या महिलेशी त्यांची मैत्री घनिष्ठ होत गेली. त्यांनी एकमेकांसोबत राहणे, सुटीला स्कीइंग करणे असे प्रकारही केले. सप्टेंबर १९७६ मध्ये लिहिलेल्या पत्रात पोप म्हणतात, की प्रिय तेरेसा, तुझी तीन पत्रे मिळाली, तू तर देवाने पाठवलेल्या भेटीसारखी आहेस. बीबीसीने जॉन पॉल द्वितीय यांची पत्रे पाहिली, पण टायमेनिका हिची पत्रे पाहिलेली नाहीत. ती २०१४ मध्ये मरण पावली.