केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या लोकप्रियतेत घट झाली आहे. परंतु, पंतप्रधानपदासाठी मोदी हे अजूनही क्रमांक एकवर आहेत. ४९ टक्के लोकांना अजूनही मोदी पंतप्रधानपदी असावेत असे वाटते. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केवळ २७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सच्या ‘मूड ऑफ द नेशन’ नावाने केलेल्या सर्वेक्षणात मोदी सरकारच्या पाच ‘टॉप’ मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार पाच पैकी चार मंत्र्यांच्या लोकप्रियतेत घट झाली आहे. फक्त एकाच मंत्र्याच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या सर्वेक्षणानुसार अर्थमंत्री अरूण जेटली क्रमांक एकवर आहेत. परंतु, जानेवारी २०१८ मधील सर्वेनुसार त्यांच्या लोकप्रियतेत २ अंकांनी घसरण झाली आहे. जुलै २०१८ मध्ये झालेल्या सर्व्हेत त्यांना २४ गुण मिळाले आहेत. तर चौथ्या क्रमांकावर नितीन गडकरी असून त्यांच्या लोकप्रियतेत एका गुणाने वाढ झाली असून त्यांना १९ गुण मिळाले आहेत.

विशेष म्हणजे २३ गुणांसह गृहमंत्री राजनाथ सिंह लोकप्रियतेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जानेवारी ते जुलै दरम्यान राजनाथ सिंह यांच्या लोकप्रियतेत एका गुणाची घट झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आहेत. त्यांना २१ गुण मिळाले आहेत. त्यांच्याही गुणात दोन गुणांची घसरण झाली आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याही लोकप्रियतेत एक अंकाची घसरण झाली असून त्यांना ९ गुण मिळाले आहेत.

या सर्वेक्षणात ३४ टक्के लोकांनी बेरोजगारी, २४ टक्के लोकांनी महागाई, १८ टक्के लोकांनी भ्रष्टाचार, ५ टक्के लोकांनी महिला सुरक्षा, ५ टक्के लोकांनी नोटाबंदीमुळे व्यापारात तोटा वाढल्याचा मुद्दा महत्वाचा असल्याचे म्टले आहे. आज जर निवडणुका झाल्या आणि काँग्रेसने सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेसशी निवडणूकर्पूव आघाडी केली तर भाजपाप्रणीत एनडीएला बहुमत मिळू शकणार नाही, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. एनडीएला २२८ जागा तर यूपीएला २२४ आणि अन्य पक्षांच्या खात्यात ९२ जागा मिळू शकतात. विशेष म्हणजे एनडीए आणि यूपीएमध्ये अवघ्या ४ जागांचा फरक राहू शकतो. देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते.