आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात स्थिर सरकार स्थापन व्हावे अशी इच्छा व्यक्त करून ‘पंगू’ (फ्रॅक्चर्ड) सरकार आल्यास देशासाठी ते विनाशकारी ठरेल, असा इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी दिला.
आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी स्थिर, विकासाला प्राधान्य देणाऱ्या प्रामाणिक सरकार स्थापनेसाठी पुढाकार घ्यावा आणि देशाला स्थिर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
६५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपती म्हणाले की, लोकशाहीत स्वतला सुधारण्याची मोठी क्षमता असून त्यावर आपला विश्वास आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या तोडफोड आणि वादविवादाच्या राजकारणाला बरे करण्यास २०१४ हे वर्ष हातभार लावेल, असे ते म्हणाले.  १९५० मध्ये प्रजासत्ताक भारताचा जन्म पाहिला आणि मला विश्वास वाटतो की, २०१४ हे वर्षही देशासाठी सकारात्मक ठरेल, असे ते म्हणाले.
आजची तरुण पिढी देशाचे भविष्य आहे. त्यामुळे त्यांना संधी द्या. ते उद्याचा उज्ज्वल भारत घडवतील. त्यामुळे देशाला स्थिर सरकार मिळाले नाही तर ही संधी हुकेल. कारण मोडकेतोडके सरकार जर आले तर देशासमोरील परिस्थिती आणखी गंभीर होईल. ही गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी आपण प्रत्येक मतदाराने आपली जबाबदारी ओळखून आपले कर्तव्य पार पाडावे आणि देशाला अस्थिरतेच्या खाईत जाण्यापासून  वाचवण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी, असेही राष्ट्रपती म्हणाले.
कट्टरपंथी संघटना आणि दहशतवादी देशातील शांतताभंग करण्याची तसेच एकात्मता तोडण्याची संधी शोधत आहेत. मात्र ते कधीच यशस्वी होणार नाहीत. आपली सुरक्षा दले भक्कमपणे उभी असून कोणतेही आव्हान चिरडण्याची त्यांच्यात क्षमता आहे. त्यामुळे जेव्हा आपल्या लोकशाहीला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातो. तेव्हा आपल्याला राग येतो, असेही ते म्हणाले.
गेल्या दोन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था काहीशी मंदावली आहे. ही बाब चिंताजनक असली तरी घाबरण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले.  शैक्षणिक क्रांती गरजेची असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
राष्ट्रपतींची केजरीवालांवर टीका
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रस्त्यावर उतरून केलेल्या निदर्शनांबाबत राष्ट्रपतींनी अप्रत्यक्षपणे टीका केली. सरकार चालवणाऱ्यांनी  रस्त्यावर उतरून आंदोलने करणे हे योग्य नाही. केजरीवाल यांचे नाव न घेता राष्ट्रपती म्हणाले की, काही दिवसांपूर्वी रेल भवन येथील दोन दिवसांच्या धरणे आंदोलनामुळे आपण व्यथित झालो. जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब करावा, असा सल्लाही राष्ट्रपतींनी दिला.