सध्या बिहार दुहेरी संकटामध्ये सापडला आहे. एकीकडे करोनाचा सामना तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरजन्य परिस्थिती. अशातच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे २९ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्घाटन केलेल्या पूलाचा एक भागच वाहून गेला. या पूलाच्या उभारणीसाठी तब्बल २६४ कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. दरम्यान, यावरून आता विरोधकांनीही याविरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत.

१६ जून रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या पूलाचं उद्घाटन केलं होतं. दरम्यान पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे या पूलाचा काही भाग पाण्यात वाहून गेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. नदीवर असलेला हा पूल सध्या पूल वाहून गेल्यानं या पूलामुळे जोडल्या जाणाऱ्या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. लालछापर, मुजफ्फरपूर, मोतिहारी आणि बेतिया या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

गोपालगंजमध्ये बुधवारी तीन लाख क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा प्रवाह होता. या पाण्याच्या प्रवाहामुळेच हा पूल वाहून गेल्याचं सांगण्यात येत आहे. या पूलाची निर्मिती २०१२ मध्ये करण्यात आली होती. तसंच यासाठी २६४ कोटी रूपयांचा खर्च आला होता. यावरून आता विरोधकांनही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना टोला हाणला. “८ वर्षांमध्ये २६३.४७ कोटी रूपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या पूलाचं नितीश कुमार यांनी १६ जून रोजी उद्घाटन केलं होतं. तो पूल २९ दिवसांनंत वाहून गेला. खबरदार जर त्यांना कोणी भ्रष्टाचारी म्हटलं तर. हा तर केवळ चेहरा दाखवण्याचा शगून आहे. एवढ्याची तर त्यांच्याकडे उंदीर दारू पिऊन जातात,” असं म्हणत त्यांनी नितील कुमारांना टोला लगावला.