राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका

पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी गोव्याला भेट दिली तर त्यांनी गोव्यातील साडेचारशे वर्षांच्या दडपशाही करणाऱ्या पोर्तुगाल राजवटीबाबत माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे.

गोव्यातील भूमीत त्यांचा सत्कार केला जाऊ नये पण भाजप सरकारला तसे करायचे असेल तर पोर्तुगालचे पंतप्रधान येथे आल्यानंतर त्यांना गोव्याच्या जनतेची माफी मागण्यास सांगावे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले.

भाजपचा मित्र पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मंत्री रामकृष्ण ढवळीकर यांनी पोर्तुगालच्या पंतप्रधानांनी गोव्याच्या जनतेची माफी मागावी असे म्हटले आहे, त्यावर आता संघानेही तीच भूमिका घेतली आहे.

पोर्तुगालचे पंतप्रधान कोस्टा यांचे मूळ दक्षिण गोव्यातील मडगाव येथे असून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव विधानसभेने १५ जानेवारीला केला होता. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी त्यापुढे जाऊन असे सांगितले की, आम्ही आगामी काळात कोस्टा यांना निमंत्रित करून त्यांचा गौरव करू.

संघाचे गोवा प्रमुख असलेल्या वेलिंगकर यांनी सांगितले की, पोर्तुगीजांनी गोव्याचे जे नुकसान केले ते भरून न येणारे आहे. गोवा साडेचारशे वर्षे त्यांच्या गुलामगिरीत होता, त्यामुळे पोर्तुगीजांनी या पापावर क्षमायाचना करावी. १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीज राजवटीपासून स्वतंत्र झाला होता.