News Flash

चिंता वाढवणारी बातमी… फायजरची करोना लस घेतल्यानंतर ४८ तासांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

मृत्यूचे कारण शोधण्यासंदर्भातील तपास सुरु

प्रातिनिधिक फोटो

पोर्तुगीजमध्ये आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या एका महिलेचा फायजरची करोना लस घेतल्यानंतर ४८ तासांमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्याचं नाव सोनिया असेवेडो असं होतं. सोनिया ४१ वर्षांच्या होत्या. लस घेतल्यानंतर सोनिया यांना कोणतेही साईड इफेक्ट दिसून आले नव्हते. मात्र लस घेतल्यानंतर दोन दिवसांमध्येच सोनिया यांचा मृत्यू झाला. सध्या सोनिया यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतरच सोनिया यांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल. ब्रिटननंतर फिनलॅण्ड आणि बुल्गेरियामध्येही अमेरिकन कंपनी असणाऱ्या फायजरची लस दिल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार सोनिया पोर्तो शहरामधील पोर्तुगीज इन्स्टिटयूट ऑफ ऑन्कोलॉजीमध्ये कार्यरत होत्या. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना यापूर्वी कोणताही आजार झालेले नव्हता किंवा कोणत्याही आजाराचे साईड इफेक्ट्सही त्यांना झाल्याचं त्यांच्या आरोग्यासंदर्भातील जुन्या अहवालांमध्ये नमूद करण्यात आलेलं नव्हतं. सोनिया यांची प्रकृती अगदी ठणठणीत होती. सोनिय यांचे वडील अबिलियो असेवेडो यांनी पोर्तुगीजमधील वृत्तपत्राला दिलेल्या माहितीमध्ये माझी मुलगी अगदी ठणठणीत होती असं म्हटलं आहे. सोनियाला कोणतीही व्याधी किंवा आजार नव्हता अशी माहितीही तिच्या वडिलांनी दिलं आहे. सोनियामध्ये करोनाची कोणताही लक्षणं दिसत नव्हती. तिच्या मृत्यूच्या एक-दीड दिवस आधीच तिला लसीकरणातील स्वयंसेवक म्हणून करोनाची लस देण्यात आली होती. तिला अचानक काय झालं मला ठाऊक नाही. मात्र तिचा मृत्यू कसा झाला याचं उत्तर मला संबंधित संस्थांकडून हवं आहे अशी मागणी सोनियाच्या वडिलांनी केली आहे. सोनियाच्या मागे तिची दोन मुलं आणि पती असा परिवार आहे.

पोर्तुगीज इन्स्टिटयूट ऑफ ऑन्कोलॉजीने जारी केलेल्या पत्राकमध्ये सोनियाला ३० डिसेंबर रोजी लस देण्यात आली होती आणि तिचा एक जानेवारी रोजी मृत्यू झाला असं सांगण्यात आलं आहे. सोनियामध्ये लसीचे कोणतेही साईड इफेक्ट दिसून आले नव्हते असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. सोनियाचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याचा तपास केला जात आहे. तिच्या आधीच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये तिला कोणताही आजार नसल्याचे स्पष्ट होतं आहे, असंही पोर्तुगीज इन्स्टिटयूट ऑफ ऑन्कोलॉजीच्या या पत्रकात म्हटलं आहे. दुसरीकडे फिनलॅण्डनंतर आता बुल्गेरियामध्येही अमेरिकेच्या फायझर कंपनीच्या सलीचे साईड इफेक्ट दिसून येत आहेत. दोन रुग्णांना अंगदुखी आणि ताप येत आहे.

फिनलॅण्डमध्ये यापूर्वी पाच रुग्णांमध्ये करोना लसीचे साईड इफेक्ट दिसून आले होते. फायझरच्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने जगभरामध्ये आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. ब्रिटमध्येही दोन आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही ही लस घेतल्यानंतर साईड इफेक्ट दिसून आले. यानंतर जगभरामध्ये फायझरचा वापर केल्या जाणाऱ्या देशांमध्ये या लसीच्या वापरासंदर्भातील दक्षता घेण्यासंदर्भाती सूचना जारी करण्यात आल्यात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 12:18 pm

Web Title: portuguese health worker 41 dies two days after getting the pfizer covid vaccine scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 संसदेच्या नव्या इमारतीसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
2 भाजपा नेत्याच्या घरासमोर शेणाची ट्रॉली खाली करणाऱ्यांविरोधात Attempt To Murder चा गुन्हा दाखल
3 शेतकरी आंदोलन : भाजपा नेत्याच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी रिकामी केली शेणाने भरलेली ट्रॉली
Just Now!
X