गोव्यातील पोर्वोरीम पोलीसांनी रविवारी दोन अल्पवयीन मुलांना तोरडा येथे असलेल्या एका तलावाजवळ दारु पिताना पकडले. इतकेच नाही तर या मुलांना शिक्षा म्हणून येथील दारुच्या बाटल्या आणि इतर कचरा साफ करायला लावला. ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. विशेष म्हणजे कारवाईमध्ये अशाप्रकारची शिक्षा केल्यानंतर पोलीसांचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

ग्रामसभेमध्ये या विषयाला वाचा फोडण्यात आली होती. तरुण मुले रात्रीच्या वेळी या तलावाजवळ दारु पितात आणि त्याच एरियामध्ये या बाटल्या टाकून कचरा करतात अशी तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी या भागात रात्रीच्या वेळी गस्त घालण्यास सुरुवात केली होती, मात्र यामध्ये कारवाई करण्यात आली नव्हती. ग्रामस्थांनी हा विषय ग्रामसभेत पुन्हा एकदा पोर्वोरीमचे पोलीस निरिक्षक परेश नाईक यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावेळी ग्रामसभेतून निघाल्यानंतर पोलीसांनी तलावाजवळ पाहणी केली. त्यावेळी त्यांना दोन अल्पवयीन मुले दारु पित बसल्याचे दिसले.

या मुलांना लगेचच ताब्यात घेऊन त्यांना हा संपूर्ण भाग साफ करायला लावला. जवळपास ३ पिशव्या भरुन कचरा गोळा करण्यासाठी या मुलांना अर्धा तास लागला. यानंतर नाईक यांनी या कचऱ्याच्या पिशव्या आपल्या स्वत:च्या गाडीत भरल्या आणि कचराकुंडीवर नेऊन टाकल्या. याचठिकाणी आणखी एक व्यक्ती दारु पिताना आढळल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र हे दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना असल्याने त्यांना सोडून देण्यात आले. इथून पुढे सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे दारु पिऊन कचरा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. अशाप्रकारे पोलीस प्रशासनाने योग्य ती दखल घेतल्याने या भागातील अनेकांनी पोलिसांचे आभार मानले.