करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या कमी होत असल्यानं अनेक राज्यांमधले लॉकडाउनचे निर्बंध हळूहळू शिथिल होऊ लागले आहेत. हा अनलॉकचा निर्णय घेताना राज्यांनी काही बाबींचा विचार करणं गरजेचं असल्याचं आय़सीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे.

डॉ. भार्गव यांनी लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी तीन अटी सांगितल्या आहेत.

हे तीन नियम असे-

१. राज्यातला बाधित रुग्ण आढळण्याचा दर ५ टक्क्यांहून कमी असायला हवा.
२. अधिक धोका असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाचा दर ७० टक्क्यांपर्यंत असायला हवा.
३. समाजाने करोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळायला हवेत.

आणखी वाचा- केंद्र सरकारचं लसीकरण धोरण : “सर्व मुख्यमंत्र्यांनी एकत्र यावं आणि…”; भाजपाच्या मुख्यमंत्र्याचं आवाहन

करोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर ज्या जिल्ह्यांमध्ये बाधित रुग्ण आढळणाऱ्यांचा आठवड्यातला दर ५ टक्क्यांहून कमी आहे, त्या जिल्ह्यांचे निर्बंध हळूहळू हटवायला हवेत. त्याचबरोबर राज्यांनी सर्वाधिक धोका असलेल्या कमीत कमी ७० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण करायला हवं. जर ते पूर्ण झालं असेल तर निर्बंध शिथिल करता येतील, असं डॉ. भार्गव यांनी सांगितलं.

आणखी वाचा- निर्बंध शिथिल होताच टोलनाक्यांवर कोंडी

त्याचबरोबर लॉकडाउन अत्यंत हळूहळू हटवायला हवं असाही सल्ला त्यांनी दिला आहे. मात्र, लसीकरण हे राज्यामध्ये प्राधान्यानं व्हावं यावर जास्त लक्ष द्यायला हवं असंही डॉ. भार्गव म्हणाले.