दीड महिन्यांच्या घणाघाती प्रचारानंतर दिल्ली विधानसभेत पुन्हा आम आदमी पक्षाचे (आप) सरकार येईल, असा अंदाज सर्वच मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, दिल्लीत ६१ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

सहा मतदानोत्तर चाचण्यांचे सरासरी कौल शनिवारी मतदानाची वेळ संपल्यानंतर जाहीर केले गेले. ते ‘आप’च्या बाजूने झुकले असून एकूण ७० जागांपैकी ‘आप’ला ५० ते ५५ तर, भाजपला १५-२० जागा आणि काँग्रेसला दोन जागा मिळतील असा या चाचण्यांचा अंदाज आहे.

‘आप’ला २०१५ मध्ये ६७ जागा मिळाल्या होत्या. भाजपला जेमतेम तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. चाचण्यांचा सरासरी कौल खरा ठरला तर ‘आप’ला गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही बहुमत मिळेल. बहुमतासाठी ३६ जागांची गरज आहे, पण ‘आप’च्या १२-१५ जागा कमी होऊ  शकतात. ‘आप’ने ‘६७ पार’ असे लक्ष्य ठेवले होते. मात्र प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाजपने आक्रमक प्रचार करून ‘आप’पुढे आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे भाजपच्या जागांमध्ये भर पडण्याची शक्यता असून गेल्या वेळेपेक्षा १२-१७ जागा जास्त मिळू शकतील. पाच वर्षांपूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हाती शून्य आले होते. त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक असल्याचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज सांगतात.

‘आप’ला २०१५ मध्ये ५४.०३ टक्के, भाजपला ३२ टक्के आणि काँग्रेसला फक्त ९.६ टक्के मते मिळाली होती. भाजपच्या जागा वाढल्या तर या पक्षाच्या मतांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. ‘आप’ने संपूर्ण निवडणूक प्रचारात विकासकामांची जंत्री मतदारांपुढे सादर केली होती. मुख्यत्वे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामांना मतदारांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. ‘आप’ने शिक्षण हाच प्रचारातील प्रमुख मुद्दा बनवल्यानंतर भाजप आणि काँग्रेसलाही त्यांच्या जाहीरनाम्यात शिक्षणाचा समावेश करावा लागला होता. मात्र प्रचाराच्या शेवटच्या दोन आठवडय़ांत भाजपने सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला लक्ष्य केले. दिल्लीतील आंदोलनाचे केंद्र ठरलेला ‘शाहीन बाग’ मुद्दा प्रमुख बनवत आप आणि काँग्रेसने ‘देशद्रोहा’ला खतपाणी घातल्याचा आरोप भाजपने केला होता.

मतदानात १० टक्के घसरण!

या वेळी दिल्लीत मतदानाची टक्केवारी १० टक्क्यांनी घसरली. निवडणूक आयोगाने संध्याकाळी ६.३० वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ५७.०६ टक्के मतदान झाले. २०१५ मध्ये ६७.०८ टक्के मतदान झाले होते. राजधानीतील मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये मात्र सरासरीपेक्षा जास्त मतदान झाले. मुस्तफाबाद, मतिया महल, सिलमपूर या मतदारसंघांमध्ये अनुक्रमे ६६.२९ टक्के, ६५.६२ टक्के आणि ६४.९२ टक्के मतदान झाले. विधानसभेच्या ७० जागांसाठी सुमारे ७०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन केले होते. केजरीवाल यांनी विशेषत: महिला मतदारांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले होते. सकाळी ८ वाजता मतदान सुरू झाले. दिवसाच्या पूर्वार्धात मतदान संथगतीने झाले. नंतर मात्र वेग वाढत गेला. तरीही शनिवारी आठवडय़ाच्या अखेरच्या दिवशी मतदानासाठी गेल्या वेळच्या तुलनेत कमी संख्येने मतदार बाहेर पडले. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जामिया आणि शाहीन बाग येथे आंदोलन सुरू असल्याने ओखला मतदारसंघात येणारे हे दोन्ही परिसर संवेदनशील घोषित करण्यात आले होते. शाहीन बाग परिसरातील पाचही मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या केंद्रांवर शांततेत मतदान झाले.

जागांचा सरासरी अंदाज

आप : ५०-५५ भाजप : १५-२० काँग्रेस : ०-२