सध्या महाराष्ट्रासह हरियाणातही विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. तसंच प्रचार करतानाही तो वेगळ्या प्रकारे करता यावा यासाठी शक्कल लढवली जात आहेत. पण हरियाणामधील अंबाला येथे एक वेगळंच चित्र पहायला मिळत आहेत. येथे मतदारांनीच आपलं समर्थन दर्शवण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली आहे.

अंबालामधील एका मुस्लीम वस्तीमधील घरांच्या बाहेर काही पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे की, “डोअर बेल खराब आहे, दरवाजा उघडण्यासाठी कृपया मोदी-मोदी आवाज द्यावा”. हा प्रकार अंबाला छावनी परिसरातील मुस्लीम वस्तीतील आहे.

हे पोस्टर का लावण्यात आले यामागची गोष्टही रंजक आहे. येथील लोकांचं म्हणणं आहे की, सध्या निवडणूक असल्याने अनेक उमेदवार मतं मागण्यासाठी दरवाजावर येतात आणि वारंवार डोअर बेल वाजवत असतात. या अशा उमेदवारांनी डोअर बेल वाजवू नये यासाठीच हे पोस्टर लावण्यात आलं आहे. लोकांचं म्हणणं आहे की, वेगवेगळ्या पक्षातील नेते मत मागण्यासाठी त्यांच्याकडे येत असतात. पण त्यांना मोदींनाच पाठिंबा द्यायचा आहे. यासाठीच हे पोस्टर लावण्यात आलं आहे. जो नेता मोदींचं नाव घेईल, त्याच्यासाठीच दरवाजा उघडण्यात येईल.

मुस्लीम महिलांनी पुढाकार घेत हे पोस्टर लावले असल्याचं सांगण्यात येत आहे. “ज्याप्रकारे नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाक विधेयक संमत केलं आहे, ती फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त होत होतं. पण आता तसं होणार नाही. त्यामुळेच आपण फक्त नरेंद्र मोदींना समर्थन देत आहोत,” असं येथील महिलांनी सांगितलं आहे.