काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रभू रामचंद्राचा अवतार दाखवणारे पोस्टर्स फाडण्यात आले आहेत. बिहारची राजधानी पाटणा येथे हे पोस्टर्स लावण्यात आले होते. हे पोस्टर्स कोणी फाडले आहेत हे अद्याप उघड होऊ शकलेलं नाही. या पोस्टर्सवर प्रभू रामचंद्रांच्या अवतारात राहुल गांधींना दाखवण्यात आलं होतं. तसंच ‘वे राम नाम जपते रहे, तुम बनकर राम जियो रे’ असा संदेशही लिहिण्यात आला होता.

राम मंदिराचा मुद्दा देशभरात गाजतो आहे, मंदिराच्या मुद्द्यावरून सगळ्याच पक्षांनी राजकारण सुरु केलं आहे. अशात आता काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे. त्यांनी थेट राहुल गांधींनाच राम अवतारात दाखवले आहे. काँग्रेसची 3 फेब्रुवारीला पाटण्यात रॅली होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटणा शहरात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. राहुल गांधी या रॅलीला हजर राहणार आहेत. त्यामुळे पाटणा येथील रस्तोरस्ती राहुल गांधींचे पोस्टर लावण्यात आले आहेत. अशातच विजय कुमार सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राम अवतारात दाखवत जन आकांक्षा रॅलीचे पोस्टर लावले आहे. या पोस्टरवर सोनिया गांधी, प्रियंका गांधी, मनमोहन सिंग यांचेही फोटो आहेत. राहुल गांधींना धनुष्यबाण घेतलेल्या रामाच्या अवतारात दाखवण्यात आले आहे.

दरम्यान याप्रकरणी राहुल गांधींविरोधात सिव्हिल कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधी, बिहार प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा आणि इतर चारजणांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत ही तक्रार करण्यात आली आहे.