पाकिस्तानमध्ये पुन्हा भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनंदन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेक पोस्टर्स सध्या लाहोरमधील रस्त्यांवर दिसत आहेत. या पोस्टर्सच्या माध्यमातून नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते अयाज सादिक यांच्यावर टीका करण्यात आली आहे. अनेक पोस्टमध्ये सादिक यांचा उल्लेख गद्दार असा असा करण्यात आला असून त्यांची तुलना मीर जाफरशी करण्यात आली आहे. सादिक यांनी संसदेमध्ये पाकिस्तानने अभिनंदनला का सोडले यासंदर्भात इम्रान खान सरकारची पोलखोल केल्यानंतर ही पोस्टरबाजी करण्यात आल्याचे समजते.

पाकिस्तानी संसदेचे माजी स्पीकर असणारे अयाज सादिक हे लाहोरचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या याच मतदारसंघामधील अनेक रस्त्यांवर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे पोस्टर्स लावून विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. या पोस्टर्सवर ऊर्दू भाषेत पीएमएल-एन पक्षाचे नेते अयाज सादिक यांना देशद्रोही असं म्हटलं आहे. काही पोस्टर्समध्ये सादिक यांना अभिनंदन यांच्या रुपात दाखवण्यात आलं असून काही पोस्टर्समध्ये अयाज सादिक हे भारत समर्थक असल्याचे विरोधकांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानचे गृहमंत्री (देशांतर्गत सुरक्षा) एजाज अहमद शाह यांनी एका सभेमध्ये अयाज सादिक यांनी भारतात निघून जावं असं म्हटलं आहे. आपल्या लष्कराविरोधात संसदेमध्ये अयाज यांनी जे वक्तव्य केलं आहे ते त्यांनी अमृतसरमध्ये जाऊन करावं, असं शाह म्हणाले आहेत. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी अयाज सादिक यांच्याविरोधात आंदोलने केली जात आहे. इम्रान खान सरकारमधील अनेक मंत्र्यांनाही त्यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे.

मात्र दुसरीकडे अयाज सादिक यांनी संसदेमध्ये केलेल्या भाषणातील प्रत्येक वाक्याबद्दल आणि दाव्याबद्दल आजही आपण ठाम असल्याचे म्हटले आहे. आपल्याकडे यासंदर्भातील अनेक यापूर्वी कधीही न उघड झालेल्या गोष्टी आणि माहिती आहे असंही सादिक यांनी म्हटलं आहे. मी राजकीय मतभेदामधून ही माहिती दिली. याचा पाकिस्तानी लष्कराशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे मतही सादिक यांनी व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा- आम्ही हिंदुस्थानला घरात घुसून मारले म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्याचा यु-टर्न, म्हणाले…

काय म्हणाले होते सादिक?

अयाज सादिक यांनी, “त्यावेळी भारत आपल्यावर हल्ला तर करणार नाही ना अशी भीती पाकिस्तानला वाटत होती. भारत पाकिस्तानवर हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय लटपटत होते आणि चेहरा घामाने भिजला होता. बाजवा यांना भारत हल्ला करेल अशी भीती होती,” असा खुलासा पाकिस्तानी संसदेत केला होता.

आणखी वाचा- पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवांना का घाम फुटला होता?, माजी एअर फोर्स प्रमुख म्हणाले…

…तर ९ वाजता हल्ला करेल

“परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी हे थरथरत होते. अभिनंदनसंदर्भात बोलताना त्यांनी खुदाचा वास्ता देत (देवाचं नाव घेत) त्याची सुटका करण्याची मागणी केली. पाकिस्तानला भीती होती की जर फायटर प्लेन पायलट असणाऱ्या अभिनंदनला सोडलं नाही तर रात्री नऊ वाजता भारत पाकिस्तानवर हल्ला करेल,” असंही अयाज सादिक म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला.