राहुल गांधी अमेठीतून हरले तर मी राजकारणातून संन्यास घेईन असं वक्तव्य नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं होतं. आता लोकसभा निवडणूक निकाल लागून एक महिना होईल. तरीही सिद्धू यांनी राजकारण सोडलेलं नाही त्यामुळे तुम्ही राजकारण कधी सोडणार असा प्रश्न विचारणारे फलक पंजाबमध्ये झळकले आहेत. अमेठी या मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी विरूद्ध काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी असा सामना होता. अमेठीतून राहुल गांधी यांचा स्मृती इराणींनी ५० हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडी घेत पराभव केला आता तुम्ही राजकारण कधी सोडणार? असा प्रश्न विचारणारे फलक पंजाबमध्ये झळकले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या आधी नवज्योत सिंग सिद्धू यांनी ही घोषणा केली होती की राहुल गांधी हे अमेठीतून हरले तर मी राजकारण सोडून देईन. एवढंच नाही तर त्यांनी सातत्याने मोदींच्या विरोधात प्रचार केला होता. राफेल घोटाळा घडवण्यामागे मोदीच आहेत असे आरोप त्यांनी वारंवार केले. लोकसभा निवडणूक प्रचार करताना त्यांचा आवाजही बसला, त्यांच्या स्वरयंत्राला इजा झाली होती. ज्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता लोकसभा निवडणूक निकाल लागून महिना होत आला आहे. राहुल गांधी हे वायनाडमधून जिंकले आहेत मात्र अमेठीतून हरले आहेत. स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला. ज्यानंतर पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू राजकारण कधी सोडणार? हे प्रश्न विचारणारे फलक लावण्यात आले आहेत.

तुम्ही काय म्हटला होतात ते विसरलात का? अमेठीतून राहुल गांधी नाही तर स्मृती इराणी निवडून आल्या आहेत आता तुम्ही राजकारण कधी सोडणार? असा प्रश्न या पोस्टर्समधून विचारण्यात आला आहे. इंग्रजी आणि पंजाबी भाषेत ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. लुधियानातील पखवाल रोडवर ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. आता या प्रश्नांना सिद्धू उत्तर देणार की गप्प बसणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.