पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या फार्महाऊसपासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर इस्लामिक स्टेट दहशतवादी गटांचे समर्थन करणारी पोस्टर्स, स्टिकर्स लावण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शहरात या दहशतवादी संघटनेचा शिरकाव झाला आहे का, याची चौकशी अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.
लाहोर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली असून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. रायविंद येथील शरीफ यांच्या निवासस्थानापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या नवाब शहर आणि थोकर नियाझ बेग येथे ही पोस्टर्स आढळली आहेत. लाहोरमधील हुंजेरवाल आणि कॅनल मार्ग येथे काही भिंतींवरही इस्लामिक स्टेटला अनुकूल असलेला मजकूर लिहिण्यात आला आहे.पोलिसांनी या बाबत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविला आहे. या प्रकारांमागे कोणत्या शक्ती आहेत ते शोधण्यासाठी पोलिसांनी अन्य संस्थांच्या मदतीने तपास सुरू केला आहे.