दिल्लीमध्ये तीन सख्या बहिणींचा मृत्यू उपासमारीमुळेच झालं असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून उघड झालं आहे. इतकंच नाही तर मुलींच्या शरिरात चरबीचे अंशही नव्हते असंही समोर आलं आहे. डॉ अमिता सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार मुलींच्या शरिरात अन्नाचा कणही नव्हता. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. हा मृत्यू कुपोषणामुळे झाला असल्याचं उघड आहे’.

तिन्ही अल्पवयीन बहिणी घरात बेशुद्ध अवस्थेत पडल्या असल्याचं दिसल्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मुलींचा वडिल कंत्राटी कामगार असून मंगळवार सकाळपासून बेपत्ता आहे. त्यांच्या आईची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं सांगण्यात येत आहे.

शेजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘तीन दिवसांपुर्वीच ते येथे आले होते. त्यांचा दरवाजा नेहमी बंद असायचा. जर त्यांनी सांगितलं असतं किंवा मागितलं असतं तर आम्ही त्यांना जेवण दिलं असतं’. ही घटना समोर आल्यापासून अनेक राजकीय नेत्यांनी परिसराला भेट देण्यास सुरुवात केली आहे. ‘आमच्या परिसरात अनेक समस्या आहेत. पण आजपर्यंत एकाही राजकारण्याने दखल घेतली नव्हती. अनेक रहिवाशांकडे तर रेशन कार्डही नाहीये’, असंही शेजाऱ्याने सांगितलं आहे.

दिल्ली माहिला आयोगाने घटनेची दखल घेत चौकशी सुरु केली आहे. लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी खासदारांनी आम आदमी पक्षावर खापर फोडत लोकांना रेशन पुरवलं जात नसल्याचा आरोप केला. दरम्यान दिल्ली सरकारने मुलींच्या आईचा वैद्यकीय खर्च उचलणार असल्याचं जाहीर केलं आहे.