४० लाख ग्राहकांना दिलासा; इंटरनेट मात्र बंदच

श्रीनगर : काश्मीरमधील ‘पोस्ट-पेड’ मोबाइल सेवा तब्बल ७२ दिवसांनंतर सोमवारी सुरू करण्यात आली. त्यामुळे ही सेवा घेणाऱ्या ४० लाख ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी इंटरनेट सेवा मात्र बंदच आहे.

काश्मीरमध्ये सोमवारपासून मोबाइल सेवा सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाने शनिवारी दिले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी ही सेवा सुरू झाली. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर ५ ऑगस्टपासून मोबाइल सेवा बंद राहिल्याने संपर्क तुटलेल्या नागरिकांनी जवळपास अडीच महिन्यांनी मोबाइलद्वारे आप्तस्वकीय, मित्रांशी संपर्क साधला. मात्र ही सेवा ‘पोस्ट-पेड’ ग्राहकांसाठीच सुरू करण्यात आली आहे. २५ लाखांहून अधिक प्रीपेड मोबाइल सेवा आणि इंटरनेट सेवा अद्यापही बंदच आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ईदपूर्वीच मोबाइल सेवा खंडित करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारी मोबाइल सेवा सुरू होताच काश्मीरमधील नागरिकांनी मोबाइलद्वारे एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस आमच्यासाठी ईदच्या सणापेक्षा कमी नाही, अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने व्यक्त केली. बाशरत अहमद या नागरिकाने केवळ एका तासात ३० जणांशी संपर्क साधला. दिल्ली आणि काश्मीरच्या बाहेरील नातेवाईकांशी ७० दिवस संपर्क नव्हता. आता त्यांच्याशी संपर्क झाल्याने दिलासा मिळाला, असेही अहमद यांनी सांगितले.

नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची : राज्यपाल.. कथुआ : मोबाइल सेवेपेक्षा काश्मीरमधील जनतेची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. दहशतवादी कारवायांसाठी मोबाइलचा वापर करतात, असे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले. इंटरनेट सेवाही लवकरच सुरू करण्यात येईल, असे मलिक म्हणाले.