काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड या दलाली पेढीकडून गहाण राखलेले समभाग हे संबंधितांच्या गुंतवणूक खात्यात हस्तांतरणाच्या सुरू झालेल्या प्रक्रियेला मंगळवारी रोखे अपील लवादाच्या (सॅट) आदेशाने स्थागिती देण्यात आली. तथापि, त्या पूर्वीच काव्‍‌र्ही घोटाळ्याने बाधित ९० टक्के गुंतवणूकदारांचे समभाग त्यांच्या खात्यात हस्तांतरित झाले आहेत.

काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंगने ग्राहकांकडून मुखत्यार पत्र मिळवून त्याचा गैरवापर केला आणि बेकायदेशीरपणे त्याच्या खात्यातील समभाग स्वत:च्या व उपकंपन्यांच्या खात्यात वळविले आणि ती गहाण ठेवून बँका आणि वित्तीय कंपन्यांकडून २,३०० कोटी रुपये उभारल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ‘सेबी’ने या प्रकरणाची दखल घेत काव्‍‌र्हीला नवीन ग्राहक नोंदविण्याला बंदी घातली, तसेच काव्‍‌र्हीच्या खात्यातूून समभागांच्या हस्तांतरणावर र्निबध आणले. सोमवारी दोन्ही राष्ट्रीय शेअर बाजारांनी काव्‍‌र्हीचा दलाली पेढी म्हणून परवाना रद्दबातल करून तिच्या बाजार व्यवहारांवर र्निबध आणले.

तथापि ‘सेबी’च्या आदेशाला आव्हान देणारी याचिका काव्‍‌र्हीला समभाग तारण कर्ज देणाऱ्या बजाज फायनान्सने रोखे अपील लवाद अर्थात सॅटकडे केली. गहाण समभागांच्या हस्तांतरणावर बंदीने कर्जदात्या कंपनीचे हित धोक्यात येते, असे बजाज फायनान्सचे म्हणणे आहे.

सॅटने ते ग्राह्य़ धरले. तथापि, तोवर काव्‍‌र्हीच्या ९५,००० गुंतवणूकदारांपैकी ८३,००० गुंतवणूकदारांचे समभाग एनएसडीएल डिपॉझिटरी सेवेकडून हस्तांतरितही केले गेले असल्याचे दिसून येते. काव्‍‌र्हीने गुंतवणूकदार ग्राहकांकडील समभाग गहाण ठेवून, २३०० कोटी रुपये उभे केले असून हा निधी स्थावर मालमत्ता उपकंपनीच्या प्रकल्पांमध्ये घातला असल्याचे सकृद्दर्शनी आढळून आले आहे.