News Flash

बगदादीचा संभाव्य वारसदारही ठार

ट्रम्प यांनी रविवारी सकाळी व्हाईट हाऊसमधून बगदादी ठार झाल्याचे जाहीर केले.

अबू बकर अल बगदादी

बैरुत : इस्लामीक स्टेटचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी याला ठार मारल्यानंतर अमेरिकन सैन्याच्या दुसऱ्या हल्ल्यात अबू हसन अल मुजाहीर हाही ठार झाल्याचा दावा सिरियातील लष्कराने व सिरियातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

मुजाहीर हा बगदादीचा वारसदार राहणार होता, असे सांगण्यात येते. कच्च्या तेलाची तस्करी करणाऱ्या ट्रकच्या मागून उत्तर सिरिया ओलांडण्यासाठी जात असताना अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात मुजाहीर मारला गेल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते हुसेन नासीर यांनी दिली.  आयसीस विरुद्ध लढा देणाऱ्या अमेरिकी सैन्यासोबत लढणारे सिरियातील कुर्दीश प्रांताचे लष्कर प्रमुख मझलुम आबदी यांनी ट्वीटरद्वारे मुजाहीर ठार झाल्याचे जाहीर केले.

अब्दुला कर्दाशकडे आयसीसीचे नेतृत्त्व

आयसीस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बकर अल बगदादी व मुजाहीर हे ठार झाल्यानंतर अब्दुल्ला कर्दाश याच्याकडे आयसीसचे नेतृत्त्व आले आहे.

कर्दाश हा इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसैन याच्या सैन्यदलात अधिकारी होता. कर्दाशची ओळख प्राध्यापक अशी असून तो पूर्वी आयसीसचे दररोजचे कामकाज सांभाळायचा. ऑगस्ट महिन्यात झालेल्या हवाई हल्ल्यात बगदादी गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी कर्दाशकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. कर्दाश हा बगदादीच्या अतिशय जवळचा असून त्याला बगदादीचा वारसदार म्हणूनही पाहण्यात येते. अमेरिकी हल्ल्यात बगदादी ठार झाल्यानंतर आयसीसच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती एका स्थानिक अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

असा ठार झाला बगदादी

‘इस्लामिक स्टेट’चा (आयसिस) म्होरक्या अबु बकर अल् बगदादी वायव्य सीरियात अमेरिकेच्या विशेष लष्करी दलांनी केलेल्या गुप्त कारवाईदरम्यान एका भुयारात आत्मघाती स्फोटात ठार झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी केली.

निर्दयी ‘इस्लामिक स्टेट’चा म्होरक्या आणि जगातला पहिल्या क्रमांकाचा दहशतवादी कुत्र्यासारखा आणि भित्र्यासारखा मारला गेला, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी बगदादी ठार झाल्याची घोषणा करताना व्यक्त केली.   ट्रम्प यांनी रविवारी सकाळी व्हाईट हाऊसमधून बगदादी ठार झाल्याचे जाहीर केले. ‘आयसिस’चा म्होरक्या बगदादी आत्मघाती स्फोट घडवण्यापूर्वी रडत आणि किंचाळत होता. त्याने आपल्या तीन मुलांनाही ठार केले, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 4:07 am

Web Title: potential successor of isis chief abu bakr al baghdadi also dead zws 70
Next Stories
1 एका महिन्यात तीन आत्महत्या
2 उपचारानंतर चिदंबरमना एम्समधून डिस्चार्ज; पुन्हा ईडीच्या कार्यालयाकडे रवाना
3 काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला; २० नागरिक जखमी
Just Now!
X