News Flash

ईश्वराचा, नैतिकतेचा सर्वाधिक संबंध दारिद्रय़ाशी!

अत्यंत कसोटीच्या क्षणांचा सामना पावलोपावली करावा लागणाऱ्या, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असणाऱ्या आणि वारंवार अन्याय सहन करावा लागणाऱ्या समाजघटकांचा ‘ईश्वर’ या संकल्पनेवर दृढ विश्वास असतो.

| November 12, 2014 01:09 am

अत्यंत कसोटीच्या क्षणांचा सामना पावलोपावली करावा लागणाऱ्या, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असणाऱ्या आणि वारंवार अन्याय सहन करावा लागणाऱ्या समाजघटकांचा ‘ईश्वर’ या संकल्पनेवर दृढ विश्वास असतो. जगात नैतिकता पुनस्र्थापित करण्याचे काम ईश्वर नक्की करेल, अशी त्यांची धारणा असते, असे एका संशोधनात पुढे आले आहे. भिन्नशाखीय संशोधकांनी केलेल्या एका संशोधनातून ही महत्त्वपूर्ण बाब पुढे आली आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या मानवी संस्कृती नैतिकतेवर अधिक श्रद्धा ठेवणाऱ्या आणि ईश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या असतात, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे.
मानवी संस्कृतीचा उगम, त्यांचा विकास आणि सभोवतालच्या परिस्थितीचा संस्कृतींवर होणारा परिणाम, मानवी समाजातील धर्मभावनेचे स्थान आदींचा अभ्यास संशोधकांकडून केला गेला. अस्तित्वासमोरच जेव्हा आव्हान उभे राहते, जगणे मुश्कील होते, अशा वेळी सर्वशक्तिशाली परमेश्वराचे मानवाला स्मरण होते, असे ऑकलंड विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक रस्सेल ग्रे यांनी सांगितले. समाजाभिमुख वर्तन असलेल्या वातावरणातील माणसांना अशा खडतर आव्हानांचा सामना करणे तुलनेने सोपे जाते, मात्र आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या माणसांना स्वबळावर विश्वास ठेवणे कठीण होऊन बसते, अशा वेळी ईश्वर त्यांना आधार वाटतो, असेही ग्रे यांनी स्पष्ट केले.
धर्माचा उदय एकतर संस्कृतिजन्य घटकांनी तरी होतो किंवा पर्यावरणीय घटक तरी त्याला कारणीभूत असतात, असे हे संशोधन सांगते. अत्यंत गुंतागुंतीच्या आणि सजीवांपैकी फक्त मानवामध्ये सापडणाऱ्या परंपरा या पर्यावरणीय, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटकांचे फलित असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. वेलिंग्टन येथील व्हिक्टोरिया विद्यापीठाचे डॉ. जोसेफ बुलबुलिया आणि रस्सेल ग्रे यांनी या संशोधनाचे लेखन केले आहे. त्यासाठी एकूण ५८३ समाजरचनांचा अभ्यास करण्यात आला आणि त्यातून नैतिकता, ईश्वर आणि मानवी समाज यांतील धागे उलगडण्यात आले, अशी माहिती डॉ. बुलबुलिया यांनी दिली.

आध्यात्मिकतेमुळे रुग्ण लवकर बरे होतात
लंडन : अध्यात्म हे जीवनात आशा आणते, आयुष्याचे ध्येय शोधण्यास मदत करते आणि जीवनाचा अर्थ उलगडून दाखवते. कोणताही रुग्ण मनाने कमकुवत झालेला असतो अशा वेळी याच तीन गोष्टी गरजेच्या असतात आणि म्हणूनच अध्यात्म रुग्ण बरा होण्यास मदत करते, असा दावा नव्या संशोधनात करण्यात आला आहे. भारतात अध्यात्म हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो त्यापेक्षा कैकपट व्यापक पद्धतीने हा शब्द वैश्विक स्तरावर वापरला जातो. त्यामध्ये आशा, अर्थ आणि उद्दिष्ट अशा बाबींचा समावेश असतो. आणि म्हणूनच असे अध्यात्म रुग्णाचे मन कणखर करण्यास बळ पुरवते, ज्यामुळे रुग्ण बरा होण्यास मदत होते, असा दावा नव्या संशोधनात करण्यात आला आहे.

एकीकडे अनेक संशोधने धर्माच्या कल्पनेवर प्रहार कसा करता येईल याकडे अधिक लक्ष देत असताना या संकल्पनेच्या उगमाची कारणे कोणती आणि त्याचा गाभा काय, हे शोधून काढण्याचा आम्ही प्रयत्न केला.
प्रा. रस्सेल ग्रे आणि डॉ. बुलबुलिया

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2014 1:09 am

Web Title: poverty is related with god and morality
टॅग : God,Loksatta,Poverty
Next Stories
1 अमेरिका आक्रमक
2 पाकिस्तानात बस-ट्रक अपघातात ५८ ठार
3 पर्यटक महिलेवर बलात्कार करून तिची नृशंस हत्या
Just Now!
X