राज्यातील आपले काही सक्षम आणि अनुभवी सहकारी पुढच्या वर्षी मंत्रिपदाची पंधरा वर्षे पूर्ण करतील. त्यांनी आता लोकसभा निवडणुकीत उतरावे अशी आपली इच्छा आहे, असे सांगतानाच राज्यात तरुण रक्ताला वाव देण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी येथे दिले. या विषयावर आपण सहकाऱ्यांशी चर्चा करणार असून, त्यांनी या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करावा, असे पवार म्हणाले.
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी आयोजित भोजन समारंभात पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपला हा इरादा व्यक्त केला. सुप्रिया सुळे यांना केंद्राच्या राजकारणात स्वारस्य आहे, तर अजित पवार यांना राज्याच्या राजकारणात रुची आहे. भविष्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व करायला अनेक जण सक्षम असून प्रफुल्ल पटेलही पक्षाचे नेतृत्व करू शकतात, असेही पवार म्हणाले.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापुढे हातमिळवणीचा प्रस्ताव ठेवला असला, तरी त्यामुळे फारसे काही साध्य होणार नाही, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. महाराष्ट्रात भाजपची कामगिरी सुधारली असती, पण गडकरी यांचे अध्यक्षपद गेल्यामुळे आता विदर्भातही भाजपची कामगिरी चांगली होईल की नाही याविषयी शंकाच वाटते, असे ते म्हणाले.

यांना मिळणार ‘बढती’?
छगन भुजबळ, गणेश नाईक, आर. आर. पाटील, बबनराव पाचपुते, जयंत पाटील, जयदत्त क्षीरसागर, रामराजे नाईक निंबाळकर, हसन मुश्रीफ