देशात विद्युतीकरणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना तयार केली असून त्याअंतर्गत आता ग्राहकांना मागणीनुसार विद्युतजोडणी मिळणार आहे. तसेच नव्या जोडणीचे शुल्क मासिक हप्त्यांद्वारे भरण्याचीही सोय असेल, अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी दिली.
सध्याच्या धोरणानुसार दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना मोफत वीजजोडणी दिली जाते. मात्र त्याच्या वरच्या स्तरांतील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी नोंदणीप्रक्रिया आणि अर्ज करण्याची पद्धत अगदी सोपी असेल. शक्य असेल तेथे सरकारी कर्मचारी ग्राहकांच्या घरी जाऊन अर्ज भरून घेतील. आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी इतक्या माहितीवर नवी जोडणी मिळू शकेल, अशीही माहिती त्यांनी दिली.
१ मे २०१८ पर्यंत देशातील १८,४५२ गावांत विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट असून ते एक वर्ष आधीच पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत वीज गायब
ऊर्जामंत्री पीयूष गोयल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत विद्युतीकरणाच्या योजनेची माहिती देत असतानाच परिषद सुरू असलेल्या स्थळी काही वेळ वीज गेली.

मंदिराबाहेर संघर्षांत तरुण विजय जखमी
डेहराडून: भाजप खासदार तरूण विजय उत्तरखंडमधील मंदिराबाहेर झालेल्या संघर्षांत गंभीर जखमी झाले आहेत. सिल्गुर मंदिराबाहेर ही घटना घडली. त्यात विजय यांच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच त्यांच्या वाहनाचेही नुकसान झाले आहे.
या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री हरिश रावत यांनी दिले आहेत.