गॅसवर आधारित वीजनिर्मिती करणारा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या रत्नागिरी जिल्ह्य़ातील दाभोळ वीजप्रकल्प गॅसपुरवठय़ाअभावी जवळपास ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. सुमारे २ हजार मेगावॉट वीजनिर्मिती क्षमतेच्या या प्रकल्पाला होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा घटल्यामुळे येथील वीजनिर्मिती  ४५० मेगावॉटवर घसरली आहे.
दाभोळ येथील रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर प्रा. लि. या कंपनीच्या वीजप्रकल्पाला प्रतिदिन ८५ लाख मेट्रिक घनमीटर गॅसचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात प्रतिदिन २९ लाख मेट्रिक घनमीटर गॅसचा पुरवठा सध्या होत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. रत्नागिरी गॅसप्रकल्पाला रिलायन्स इंडस्ट्रीजच्या केजी-डी ६ क्षेत्रातून प्रतिदिन ७६ लाख मेट्रिक घनमीटर गॅस मिळणे अपेक्षित आहे. मात्र, केजी-डी ६मधील गॅसनिर्मिती गेल्या दोन वर्षांत एक तृतीयांशपर्यंत घटल्याने तेथून २३ लाख मेट्रिक घनमीटर गॅसचा पुरवठा होत आहे. याशिवाय ओएनजीसीच्या पश्चिम किनारपट्टीतील गॅसनिर्मिती क्षेत्रातून प्रतिदिन अवघे ६ लाख मेट्रिक घनमीटर गॅसपुरवठा होत असल्याने दाभोळची वीजनिर्मिती लक्षणीयरीत्या घसरली आहे. त्यामुळे येथील व्यवहारच ठप्प होण्याची भीती सूत्रांनी वर्तवली आहे.
हा वीजप्रकल्प पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी प्रतिदिन ९२ लाख मेट्रिक घनमीटर गॅसपुरवठा आवश्यक असताना प्रत्यक्षात कंपनीला प्रतिदिन ८५ लाख मेट्रिक घनमीटर गॅस मंजूर करण्यात आला. मात्र, आता तोही मिळत नसल्याने प्रकल्पाच्या एकूण क्षमतेच्या ३२ टक्के इतकेच काम येथे सुरू आहे.