नवाज शरीफ यांच्या पक्षातील बडे नेते झरदारींच्या पाठिशी
देशात सरकारविरोधी वातावरण तापत असतानाच सत्तारूढ पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) राजकीय बळ मात्र वाढले आहे. पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज शरीफ गट) आणि पाकिस्तान मुस्लीम लीग (एफ) या पक्षांच्या पंजाब प्रांतातील काही नेत्यांनी ‘पीपीपी’मध्ये प्रवेश केला आहे.
पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज शरीफ गट) या प्रमुख विरोधी पक्षाच्या दोन बडय़ा नेत्यांनी पक्षत्याग करीत झरदारी यांच्या पक्षात प्रवेश केल्याने शरीफ यांना हा मोठा हादराच मानला जात आहे. झेलम जिल्ह्य़ातील या पक्षाचे नेते राजा अफज़्‍ाल तसेच त्यांचे पुत्र व पाकिस्तानी संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील सदस्य राजा असद आणि  राजा सफदर यांनीही शरीफ यांची साथ सोडून पीपीपीमध्ये प्रवेश केला आहे. नवाज शरीफ यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मध्य पंजाब प्रांतात यामुळे पीपीपीचा शिरकाव झाला आहे.
दक्षिण पंजाबमध्ये पाकिस्तान मुस्लीम लीग (एफ) पक्षाचा त्याग करून तेथील राज्यपाल महमूद आणि त्यांचे पुत्र मखदूम मुस्तफा महमूद आणि महमूद मुर्तझा महमूद यांनीही पाकिस्तान पीपल्स पार्टीत प्रवेश केला आहे. मखदूम हे खासदार आहेत तर मुर्तझा हे पंजाब विधानसभेचे सदस्य आहेत.
राज्यपाल मखदूम अहमद महमूद यांचा धार्मिक प्रभाव मोठा असून रहीमयार खान जिल्ह्य़ातील पाकिस्तानी संसदेच्या सर्व सहा आणि प्रांतिक विधिमंडळाच्या सर्व १३ जागांवर त्यांचेच वर्चस्व आहे. महमूद हे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांचे पुतणे आहेत. त्यांनी राज्यपालपद स्वीकारण्यास पाकिस्तान मुस्लीम लीग (एफ) पक्षाच्या श्रेष्ठींनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे त्यांचा पक्षत्याग अपेक्षितच होता. तर राजा अफज़्‍ाल यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना नवाज़्‍ा शरीफ बळ देऊ लागल्याने त्यांचाही पक्षत्याग अपेक्षित होता.
पीपीपीचे सरकार या मार्चमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करीत असून मेमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर पंजाबात वाढलेल्या बळाचा पक्षाला मोठा फायदा होण्याची चिन्हे आहेत.
नवाज़्‍ा शरीफ यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याने मात्र पाकिस्तान पीपल्स पार्टीतीलही कित्येक नेते आमच्या पक्षात येण्याच्या तयारीत आहेत, असा दावा केला आहे.