केंद्र सरकारने ऊर्जा क्षेत्रासाठी दिलेल्या निधीचा योग्य वापर मध्य प्रदेश सरकारकडून केला जात नसल्याचा आरोप केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे.
मध्य प्रदेश राज्यातील ऊर्जा क्षेत्राच्या पायाभूत विकासाचे चित्र भकास झाले असून केंद्र सरकारने राज्याला आखून देण्यात आलेल्या परिमाणापेक्षा ३० टक्के अधिक निधी मंजूर करण्यात आलेला असतानाही ऊर्जानिर्मितीमध्ये वाढ झाली नाही, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांच्या योजनेचे उद्घाटन करण्यासाठी शिंदे भिंद जिल्ह्यातील मेहगाव येथे आले होते. केंद्र सरकारची वर्तणूक सापत्नभावाची असल्याचा मध्य प्रदेश सरकारने केलेला आरोप शिंदे यांनी सपशेल फेटाळला.
मध्य प्रदेश सरकारमधील १३ मंत्र्यांची लोकायुक्तांकडून चौकशी करण्यात येत असून राज्यात बंडाळी आणि भ्रष्टाचार बोकाळला आहे, असेही ऊर्जा राज्यमंत्री म्हणाले.