अरुणाचल प्रदेशात सत्तासंघर्ष शिगेला; काँग्रेसचा राज्यपालांवर आरोप
अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेसचे बंडखोर नेते कालिको पल यांनी पक्षाचे आणखी आमदार संपर्कात असल्याचा दावा केला असून, त्यांची संख्या वाढतच जाईल, असे म्हटले आहे.
काँग्रेसचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असून त्यामुळे आमचे संख्याबळ वाढेल, असे पल म्हणाले. त्यांची अभिरुप विधानसभा घेऊन मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली होती.
अरुणाचल प्रदेश विधानसभेत एकूण ६० आमदार असून त्यापैकी काँग्रेसचे ४७ आमदार आहेत. त्यापैकी काँग्रेसचे २१ जण भाजपचे ११ जण आणि दोघा अपक्ष आमदारांनी पल यांना पाठिंबा दिल्याचा दावा आहे.
‘राज्यपालांची कृती योग्य’
राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलाविण्याची राज्यपाल ज्योतिप्रसाद राजखोवा यांची कृती घटनेने त्यांना दिलेल्या अधिकारांतच असल्याचे मत अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी व्यक्त केले आहे.

राज्यपाल भाजपचे हस्तक – गोगोई
अरुणाचल प्रदेशातील राजकीय पेचप्रसंगात राज्यपाल ज्योतिप्रसाद राजखोवा यांचे वर्तन भाजपचे हस्तक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असल्यासारखे होते, असा आरोप आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी शनिवारी येथे केला. ज्योतिप्रसाद राजखोवा यांचे वर्तन कठपुतळीसारखे होते. त्यांचे वर्तन भाजपच्या हस्तकासारखे आणि संघाच्या प्रचारासारखे होते आणि त्यामुळे राज्यपालपदाची प्रतिमा मलीन झाली, असा आरोपही गोगोई यांनी एका पत्रकार परिषदेत केला.
राजखोवा यांनी घटनात्मक नियमांचे पालन करून घटनात्मक प्रमुख या नात्याने वर्तन करावयास हवे होते. ते मुख्य सचिव होते, त्यामुळे त्यांना नियम माहिती नाहीत असे नाही. घटनेनुसार त्यांनी नियमांचे पालन करावयास हवे होते, असेही गोगोई म्हणाले.