व्हीआयपी संस्कृती नष्ट करण्याचा कितीही प्रयत्न केला जात असला तरी वास्तवात तसे चित्र नसल्याचे दिसत आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, अशीच घटना मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात पाहायला मिळाली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग व्हावे यासाठी वीज विभागाने तब्बल १२ तासांपर्यंत २० गावांची वीज बंद ठेवली. बारा तासापर्यंत ही गावे अंधारात होती.

विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने याची वृत्तपत्रात जाहिरात देत लोकांना याची माहिती दिली. राजनाथ सिंह यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी १९ मे सांयकाळी ४ ते २० मे सांयकाळी ६ पर्यंत वीज पुरवठा बंद करण्यात येईल. कारण जेथे हेलिकॉप्टरचे लँडिंग होणार आहे तिथे उच्च दाब क्षमतेच्या दोन वीज वाहिन्या गेल्याचे जाहिरातीत सांगण्यात आले.

अनेक तास वीज बंद ठेवल्यामुळे स्थानिक लोकांनी वीज विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. त्यानंतर रविवारी पहाटे तीनच्या सुमारास पुन्हा एकदा वीज पुरवठा सुरू करण्यात आला. सतना येथे जाण्यासाठी रविवारी राजनाथ सिंह यांच्यासाठी दुसरा मार्ग तयार करण्यात आला. राजनाथ सिंह सतना येथे हुतात्मा ठाकूर रणमत सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री शिवराज सिंह हेही उपस्थित होते.

सतनामध्ये सध्या तापमानाचा पारा ४० डिग्रीपर्यंत पोहोचला आहे. अशा वातावरणात वीज पुरवठा बंद केल्यामुळे ग्रामस्थांचाही पारा वाढला होता. ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा राजनाथ सिंह यांना या प्रकाराची माहिती समजली. तेव्हा त्यांनी रस्ते मार्गे कोठी नगरला जाण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाला त्वरीत वीजपुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या.