पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला स्पष्टपणे नाकारले. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू्प्रसाद यादव आणि जनता दल युनायटेडचे नेते नितीशकुमार यांच्यावर बिहारमधील जनतेने विश्वास दाखवला असून, पुढील पाच वर्षांसाठी त्यांच्याच हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. एकूण २४३ जागा असलेल्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेला १२२ जागांचा टप्पा ओलांडून महाआघाडीने सत्ता मिळवली आहे. महाआघाडीला तब्बल १७७ जागांवर यश मिळाले आहे. दुसरीकडे भाजपच्या नेतृत्त्वाखालील आघाडीला जागांचे शतकही ओलांडता आलेले नसून, केवळ ५९ जागांवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. भाजपसोबत आघाडीत असलेल्या रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्ष, जीतनराम मांजी यांच्या हिंदुस्थानी अवामी मोर्चा याही पक्षांना मतदारांनी नाकारल्याचे चित्र आहे. दिल्लीपाठोपाठ सलग दुसऱ्या मोठ्या पराभवामुळे केंद्रातील सत्ताधारी भाजपला आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाच मतदारांनी दिला असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
विविध एक्झिट पोल्सनी वर्तविल्यानुसार, बिहारमध्ये महाआघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. मतदारांनी महाआघाडीच्या पारड्यात १७७ जागा टाकल्या आहेत. तर दुसरीकडे भाजप आघाडीला केवळ ५९ जागा मिळाल्या आहेत. एकूण ७ जागांवर अपक्ष आणि इतर पक्षांचे उमेदवार जिंकले आहेत. महाआघाडीमध्ये जदयुला ७१, राजदला ८० जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पक्षाला २७ जागा मिळाल्या आहेत.
सरकारचा रिमोट लालूंच्या हाती
महाआघाडीतील पक्षांच्या नेत्यांनी नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. मात्र, मतमोजणीमध्ये जदयुपेक्षा लालूप्रसाद यादव यांच्या राजदला जास्त जागा मिळाल्यामुळे आता ते काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी आम्हाला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील, असे रविवारी सांगितले. असे असले तरी जास्त जागा राजदकडे असल्यामुळे सत्तेचा रिमोट लालूंच्या हातीच राहणार, हे स्पष्ट आहे.
भाजपची आधी आघाडी नंतर पिछाडी
देशातील राजकीय वर्तुळासह अनेकांचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला रविवारी सकाळी सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यांत बिहारमधील मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप आघाडीला पसंती दिल्याचे चित्र होते. मात्र, मतमोजणी सुरू झाल्यावर दीड तासाने जदयू, राजद आणि काँग्रेस महाआघाडीनेही वेगवेगळ्या जागांवर आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाआघाडीच्या उमेदवारांची आघाडी कायम राहिली आणि दुसरीकडे भाजप आघाडीचे उमेदवार पिछाडीवर पडत गेले. जदयू आणि राजद या दोन्ही पक्षांनी समसमान १०१ जागा लढविल्या होत्या. जदयुच्या तुलनेत राजदने अधिक चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीला राजदचे उमेदवार मागे होते. पण मतमोजणीच्या उत्तरार्धात राजदचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसू लागले. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव यांनी रविवारी सकाळीच महाआघाडीला १९० जागा मिळतील, असे म्हटले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री व जदयुचे नेते नितीशकुमार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे गेल्या महिन्याभरापासून देशभरात बिहार निवडणुकीची चर्चा सुरू आहे. पाच टप्प्यांत झालेल्या या निवडणुकीत सरासरी ५७ टक्के मतदान झाले होते.