16 December 2017

News Flash

बॉम्बस्फोटांनी हैदराबाद हादरले; १६ जण ठार, ११९ जखमी

अजमल कसाब व अफझल गुरू यांच्या फाशीच्या अमलबजावणीनंतर दहशतवादी संघटनांकडून त्याला प्रत्युत्तर दिले जाण्याची

वृत्तसंस्था, हैदराबाद | Updated: February 22, 2013 10:04 AM

अजमल कसाब व अफझल गुरू यांच्या फाशीच्या अमलबजावणीनंतर दहशतवादी संघटनांकडून त्याला प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता हैदराबादमध्ये गुरुवारी झालेल्या दोन स्फोटांनी खरी ठरवली. दिलसुखनगर भागात कोनार्क आणि वेंकटाद्री या दोन सिनेमागृहांबाहेर सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या दोन स्फोटांत १६ ठार, तर ११९ जखमी झाले. दोन्ही ठिकाणी सायकलींवर आयईडी ठेवून स्फोट घडवण्यात आले. हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट करताना दोन दिवसांपूर्वीच दहशतवादी हल्ल्याची पूर्वसूचना दिली होती, असा दावा केंद्र सरकारने केला.
हैदराबादच्या दिलसुखनगर या गजबजलेल्या भागात गुरुवारी सायंकाळी सात वाजल्यापासून पाच मिनिटांच्या अंतराने दोन बॉम्बस्फोट होऊन १६ ठार, तर ११९ जखमी झाले. कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी हा दहशतवादी हल्लाच होता, असा निर्वाळा पोलिसांनी दिला आहे. या स्फोटांनंतर आंध्र प्रदेशात तसेच पश्चिम बंगालमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
बसस्थानक, भाजीबाजार व फळबाजार तसेच चित्रपटगृहे असलेल्या दिलसुखनगरात सायंकाळी सात वाजून एक मिनिटांनी पहिला तर सात वाजून सहा मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. कोनार्क आणि वेंकटाद्री या चित्रपटगृहांजवळील हॉटेलांलगत दोन दुचाक्यांना बांधलेल्या शक्तिशाली बॉम्बद्वारे हे स्फोट घडविले गेले. या परिसरातील गल्ल्या अरुंद असल्याने स्फोटाने भांबावून लोक सैरावैरा धावू लागले तेव्हा चेंगराचेंगरीसारखी स्थितीही निर्माण झाली होती. स्फोटात ठार झालेल्यांच्या शरीराचे तुकडे, चपला, खरेदीसाठीच्या पिशव्या सर्वत्र विखुरल्या होत्या. स्फोटाचा आवाज दोन ते तीन किलोमीटरवरही ऐकू आला.
हैदराबादमध्ये याआधी २५ ऑगस्ट २००७ रोजी दोन स्फोट झाले होते आणि त्यात ४२ जण ठार झाले होते. त्याच वर्षी मक्का मशिदीत झालेल्या स्फोटात नऊजण दगावले होते.
* अत्यंत गजबजलेल्या दिलसुखनगर भागातील कोनार्क सिनेमागृहाबाहेर सायं. ६.५८ वाजता पहिला स्फोट.
*  तीन मिनिटांनंतर १५० मी.अंतरावरील ‘वेंकटाद्री’बाहेर स्फोट.
*  स्फोटांनंतरच्या धावपळ, चेंगराचेंगरीत अनेक जखमी.
इशारा दिला होता
केंद्रीय गुप्तचर विभागाच्या हवाल्याने देशभर गेले दोन दिवस आंध्र प्रदेशासह सर्व राज्यांना अतिदक्षतेचा इशारा दिला होता, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. अफज़्‍ाल गुरू आणि अज़्‍ामल कसाब या दोघांच्या फाशीचा बदला म्हणून पाकिस्तानातील दहशतवादी संघटना घातपाती कृत्य घडविण्याची खबर होती, त्यामुळे हा इशारा देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

उत्तर प्रदेश, दिल्लीसह देशभर इशाराघंटा
हैदराबादमधील स्फोटांच्या पाश्र्वभूमीवर राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळात अतिदक्षतेचा इशारा नव्याने देण्यात आला. दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफज़्‍ाल गुरूला नुकतेच फासावर लटकावल्यानंतर हे अधिवेशन सुरू होत असल्याने या स्फोटांनंतर बंदोबस्तात कमालीची वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात महाकुंभची गर्दी ओसरत असली तरी १० मार्चच्या शिवरात्रीलाही गर्दी वाढणार आहे. त्यामुळे तेथेही दक्षता बाळगली जात आहे.

दोषींची गय नाही – पंतप्रधान
हे अत्यंत क्रूर कृत्य असून यामागील दोषींची अजिबात गय केली जाणार नाही, असे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये व जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली.

हा देशावरचाच हल्ला – ओवैसी
हैदराबादचे खासदार असादुद्दिन ओवैसी यांनी सांगितले की, हे स्फोट म्हणजे देशावरच हल्ला असून त्याचे राजकारण केले जाऊ नये. या घडीला राजकारण मागे टाकले पाहिजे. समाजकंटकांचे फावेल असे वर्तन कोणी करू नये, असेही ते म्हणाले.

गाफिलपणा नडला – नायडू
अफज़ल गुरू आणि कसाबच्या फाशीचा बदला घेण्याच्या धमक्या अतिरेक्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे सरकारने अधिक काळजी घ्यायला हवी होती. पण आम्ही दोषारोपापेक्षा परिस्थिती पूर्वपदावर यावी यासाठी प्रशासनाशी सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत, असे भारतीय जनता पक्षाचे नेते व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

First Published on February 22, 2013 10:04 am

Web Title: powerful blast shock hyderabad