पाकिस्तानचा दक्षिण भाग मंगळवारी पहाटे शक्तिशाली भूकंपाने हादरला. तब्बल ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपात ४५ जणांचा मृत्यू झाला तर, ८० जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तान व सिंध प्रांतात भूकंपाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या प्रांतातील अनेक शहरांमध्ये शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.
भूकंपाचा केंद्रबिंदू बलुचिस्तान प्रांतातील अवारान शहरापासून  ६९ किलोमीटर अंतरावर होता, अशी माहिती भूगर्भशास्त्र विभागाने दिली. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर या प्रांतातील अनेक नागरिक त्यांच्या घरातून, कार्यालयांतून, दुकानांमधून बाहेर आले. बलुचिस्तानची राजधानी क्वेटासह अनेक शहरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.दरम्यान, राजधानी दिल्लीलाही भूकंपाचे धक्के जाणवले. काही भागांत तीव्रता अधिक जाणवल्यामुळे लोक रस्त्यावर आले. मात्र कोणतीही हानी झाली नाही.