खनिज उद्योगातील कंपन्यांच्या लाखो डॉलरची बचत
अतिशय शक्तिशाली असे क्ष-किरण वापरून सोन्याचे खनिज शोधण्याचे नवे तंत्र विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे खनिज उद्योगातील कंपन्यांचे दरवर्षी खर्च होणारे लाखो डॉलर वाचणार आहेत.
राष्ट्रकुल वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेने केलेल्या पथदर्शक अभ्यासात असे दिसून आले आहे, की गॅमा किरण क्रियाशीलता तंत्राने पारंपरिक रासायनिक विश्लेषण पद्धतीपेक्षा खूप अचूक व कमी वेळात सोन्याचे खनिज शोधता येते. याचा अर्थ खाणकाम कंपन्या त्यांच्या प्रक्रिया विभागात नेमके किती सुवर्ण खनिज येते व किती बाहेर जाते यावर लक्ष ठेवू शकतील, इतरवेळीप्रमाणे सोन्याच्या खनिजाचे कण यामुळे वाया जाणार नाहीत.
गॅमा किरण पद्धतीच्या (जीएए) मदतीने केलेल्या खनिज नमुन्यांच्या विश्लेषणात खनिजाचे अर्धा किलोपेक्षा कमी वजनाचे नमुने घेण्यात आले व त्यांच्यावर रुग्णालयात वापरतात त्या क्ष- किरणांचा मारा करण्यात आला. क्ष-किरणांमुळे नमुन्यात जर कुठे सोन्याचे कण असतील तर ते क्रियाशील होतात व संवेदनशील शोधकाने त्यांचे अस्तित्व सिद्ध करता येते. या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. जेम्स टिकनर यांनी सांगितले, की ही पद्धत सध्याच्या फायर अ‍ॅसे या पारंपरिक पद्धतीपेक्षा अचूक आहे, त्यात सोन्याच्या खनिजाचे नमुने १२०० अंश सेल्सियस तापमानाला गरम केले जातात. सोन्याच्या खनिज नमुन्यात अतिशय कमी सोने असले तरी त्या या नव्या जीएए पद्धतीने एक टन खनिजात १ ग्रॅम सोने असेल तरी ते शोधले जाते.

नवीन पद्धतीचे फायदे
टिकनर यांच्या मते सोने प्रक्रिया प्रकल्पांमध्ये खनिजातील ६५ ते ८५ टक्के सोनेच प्रत्यक्षात बाहेर काढले जाते. सध्याच्या पद्धतीत वर्षांला १ अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलरचेच सोने मिळवले जाते. बाकीचे सोने चक्क वाया जाते. जर नवीन जीएए पद्धत वापरली तर त्यातील एक तृतीयांश सोने वाचवता येऊ शकते. पारपंरिक फायर अ‍ॅसे पद्धतीत खनिजाचे नमुने केंद्रीय प्रयोगशाळेत पाठवले जातात व नंतर अनेक दिवस त्यांच्या निष्कर्षांची वाट पाहावी लागते. जीएए पद्धतीत मात्र लगेच खनिजाचे विश्लेषण होते तसेच या पद्धतीत शिशासारखे जड धातू वापरू शकतील, या तंत्राचा वापर सध्या तरी सोने शोधण्यासाठी केला असला तरी ते चांदी, शिसे, तांबे, प्लॅटिनम समूहातील धातू शोधण्यासाठी वापरता येईल असे टिकनर यांचे मत आहे.