पदाचा गैरवापर करून कुटुंबीयांच्या नावे कोटय़वधींची संपत्ती जमविल्याच्या आरोपावरून पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याविरोधात केंद्रीय दक्षता आयोगाकडे (सीवीसी) तक्रार दाखल करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. देशमुख हे राजकीय प्रभाव असलेले अधिकारी असून गेल्या १० वर्षांत त्यांची एकदाही पुणे जिल्ह्य़ाबाहेर बदली झालेली नाही, याकडे कुंभार यांनी आयोगाचे लक्ष वेधले आहे.
देशमुख यांनी अनेक ठिकाणी कुटुंबीयांच्या नावे जमीन खरेदी केली, असे कुंभार यांनी तक्रारीत म्हटले आहे. देशमुख यांनी पत्नी अनुराधा, मुलगा मयूराज तसेच त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नावे  कोटय़वधींची मालमत्ता आहे. अनेक ठिकाणी देशमुख यांनी कुटुंबीयांना मालमत्ता खरेदीसाठी सहकार्य केले. पुण्याजवळ नांदेड टाऊनशिप प्रकल्पात प्रभाकर देशमुख यांनी पत्नी, मुलगा व मुलगी हर्षदा यांच्यासह एकत्रितपणे जमीन खरेदी केली आहे.