स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध सराव होणार आहे. रशियात सप्टेंबरमध्ये हा बहुराष्ट्रीय युद्ध सरावाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये चीनसह अनेक देशही सहभागी होणार आहेत.

शांघाई सहकार्य संघटनेने (एससीओ) आखलेल्या कार्यक्रमानुसार, हा युद्ध सराव होणार आहे. सुरक्षा समुहाच्या या संस्थेवर चीनचे प्रभुत्व असून या संस्थेला आता नाटोची बरोबरी करणारी संस्था म्हणून ओळखण्यात येत आहे.

दहशतवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने घेण्यात येणाऱ्या या युद्ध सरावात एससीओचे सदस्य देश सहभागी होणार आहेत. हा युद्ध सराव रशियाच्या उरल पर्वत क्षेत्रात होणार आहे. एससीओचे जवळपास सर्वच देश यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात शांतता नांदावी यासाठी घेण्यात येणाऱ्या या युद्ध सरावाचा मुख्य उद्देश एससीओच्या आठ सदस्य देशांमध्ये दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी सहकार्य वाढवणे हे आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात बीजिंगमध्ये एससीओ सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी या सरावात भारत सहभागी होणार असल्याचे सांगितले होते.

एससीओची स्थापना शांघाईमध्ये २००१ मध्ये झाली होती. रशिया, चीन, किर्गीज गणराज्य, कजाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उजबेकिस्तान हे देश या संघटनेचे सदस्य आहेत. गेल्याच वर्षी भारत आणि पाकिस्तान या देशांना एससीओच्या स्थायी सदस्याच्या रुपात सहभागी करण्यात आले होते.