गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल या शाळेत प्रद्युम्न ठाकूरची हत्या सप्टेंबर महिन्यात झाली होती. या हत्या प्रकरणात कंडक्टरला जामीन मिळाल्यानंतर आता सीबीआयने विशेष तपास पथकात (SIT) असलेल्या पोलिसांचे बँक अकाऊंट्स आणि कॉल रेकॉर्ड तपासण्याचा निर्णय घेतला आहे. प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणात पोलिसांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर आता सीबीआयने या पोलिसांची बँक खाती आणि कॉल रेकॉर्ड्स तपासण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष तपास पथकाने प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येप्रकरणी बस कंडक्टर अशोकला दोषी मानत अटक केली होती. त्यानंतर  सीबीआयने ८ नोव्हेंबररोजी याच हत्येप्रकरणी रायन इंटरनॅशनलच्या अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. विशेष तपास पथकाच्या तपास कार्यात काही त्रुटी राहिल्या आहेत असेही सीबीआयने म्हटले आहे. त्याचमुळे आता सीबीआयने एसआयटीमधील पोलिसांची बँक खाती तपासण्याचा निर्णय घेतला आहे. अकरावीत शिकणाऱ्या या मुलाने परीक्षा आणि पालकसभा टाळण्यासाठी प्रद्युम्नची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

 

काय आहे प्रद्युम्न हत्या प्रकरण?

८ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास प्रद्युम्नचा मृतदेह रायन इंटरनॅशनल शाळेच्या स्वच्छतागृहात सापडला

यानंतर शाळेच्या वतीने तातडीने पोलिसांना बोलावण्यात आले. प्रद्युम्नच्या आई वडिलांनाही हत्येची माहिती देण्यात आली.

प्रद्युम्नच्या हत्येनंतर संतप्त पालकांनी आंदोलन सुरू केले. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी केली.

बस कंडक्टर अशोकला पोलिसांनी अटक केली. प्रद्युम्नचे लैंगिक शोषण करून त्याचा गळा चिरल्याचा ठपका अशोकवर ठेवण्यात आला.

प्रद्युम्नच्या आई वडिलांकडून सीबीआय चौकशीसाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली.

हत्येप्रकरणी पोलिसांकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. तसेच हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सीबीआय चौकशीचे आश्वासन दिले

ज्यानंतर सीबीआयने हे प्रकरण हाती घेतले. ८ नोव्हेंबर रोजी सीबीआयने प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली.

पालकसभा आणि परीक्षा टाळण्यासाठी अकरावीत शिकणाऱ्या मुलाने प्रद्युम्नचा खून केला ही धक्कादायक माहिती समोर आली, तर २१ नोव्हेंबर रोजी याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कंडक्टर अशोकला जामीन देण्यात आला