शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत, मात्र त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. तसंच, २०१४च्या निवडणुकीनंतर शिवसेना भाजपाला पाठिंबा द्यायला तयार नव्हते याची आठवण त्यांनी करून दिली. तेव्हा राष्ट्रवादीने आमदारांच्या दबावाखाली सरकारला बाहेरून पाठिंबा दिला, त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर जाण्यात आम्हाला अडचण आहे असे आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले.

संभाजी भिडेंचा संदर्भ देताना, भिडेची पिलावळ राष्ट्रवादी मध्ये आहेत, उदयनराजे हे भिडेंची बाजू मांडतात मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसं जाणार? असा सवालही आंबेडकरांनी विचारला आहे. काँग्रेस बरोबर आम्हाला युती करायची आहे, त्यासाठी आम्ही तयार आहोत, मात्र काँग्रेसच्या मित्रांबरोबर नाही असे त्यांनी स्पष्ट केले. ओवेसींच्या एमआयएम बरोबर युती करणार, निवडणूक लढवणार, आता मागे फिरणार नाही याची ग्वाही आंबेडकरांनी यावेळी दिली.

काँग्रेस साठी दरवाजे उघडे आहेत आणि निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार असणार असे स्पष्ट करतानाच मात्र राष्ट्रवादीसोबत जाण्यास आम्ही तयार नाही असे आंबेडकर म्हणाले. राष्ट्रवादी भाजप बरोबर जाणार नाही याची खात्री त्यांनी काँग्रेसला द्यावी, तसे झाले तरच यावर विचार होऊ शकतो अशी वाट मात्र आंबेडकरांनी राष्ट्रवादीसोबत जाण्यासंदर्भात मोकळी ठेवली आहे.