14 August 2020

News Flash

केंद्रीय गृहमंत्र्यांकडे राज्यांच्या आढाव्याची मागणी

जावडेकर यांचे शहा यांना पत्र; सहस्रबुद्धे यांची महाराष्ट्रातील निर्णयांवर टीका

जावडेकर यांचे शहा यांना पत्र; सहस्रबुद्धे यांची महाराष्ट्रातील निर्णयांवर टीका

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा टाळेबंदी लागू करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज्यांतील स्थितीचा आढावा घेण्याची विनंती केली आहे. हीच मागणी राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनीही केली आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सुस्पष्ट व सातत्यपूर्ण निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली आहे.

फक्त महाराष्ट्रच नव्हे तर, कर्नाटक, तामीळनाडू अशा विविध राज्यांतील करोनाच्या परिस्थितीचा आढावा गृहमंत्री अमित शहा यांनी घ्यावा, अशी विनंती केली असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली. दिल्लीमध्ये शहा यांनी लक्ष घातल्यानंतर राजधानीतील करोनाची हाताबाहेर गेलेली परिस्थिती आटोक्यात आणली गेली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र वा अन्य राज्यांमध्ये त्यांनी लक्ष घातले तर त्याचा फायदा होईल. राज्या-राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवली जात आहेत. पंतप्रधानांच्या स्तरावरही आढावा घेतला जात आहे, पण केंद्रीय गृहमंत्र्यांच्या स्तरावर आढावा बैठक झालेली नाही. या बैठका घेतल्या तर राज्यांमधील करोनाच्या परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल, असेही जावडेकर म्हणाले.

राज्यात पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणावर जावडेकर म्हणाले की, लोकांनी शारीरिक अंतर ठेवणे, मुखकवच वापरणे हे नियम पाळणे गरजेचे आहे. त्याशिवाय, विलगीकरण, रुग्णांवर उपचार या उपाययोजनांमधून करोनाचा प्रादुर्भाव रोखला गेला पाहिजे. धारावीमध्ये करोना आटोक्यात आणण्यात यश मिळालेले आहे. टाळेबंदीने सर्व व्यवहार एकदम ठप्प होतात. त्यामुळे टाळेबंदी पुन्हा लागू करताना राज्य सरकारने नीट विचार करून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे.

टाळेबंदीपेक्षा ‘नेहमीसारखे जगणे, शिस्तीने व सावधपणे’ या धोरणाचा अवलंब करण्याचे आवाहन सहस्रबुध्दे यांनी पत्राद्वारे केले असून लोकांनी नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी. कडक नियम करावेत व ते अमलात आणावेत. गर्दी टाळण्यासाठी सर्व प्रकारची दुकाने उघडी ठेवावीत. मोठय़ा दुकानांमध्ये लोकांना नियमांचे पालन करणे भाग पाडावे. मोकळ्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने बगिचे, देवळे, खुल्या व्यायामशाळा बंद करू नयेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

‘महाराष्ट्रातील स्थितीचा अहवाल मागवा’

महाराष्ट्रात राज्य प्रशासनाच्या धरसोड वृत्तीमुळे गरिबांचेच नव्हे तर मध्यम वर्गाचेही अतोनात नुकसान होत आहे. केंद्राने राज्यातील करोना परिस्थितीचा अहवाल मागवावा, अशी मागणी राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. राज्य सरकारने काही आठवडय़ांपूर्वी ‘पुन:श्च हरि ओम’ केले, आता पुन:श्च टाळेबंदी केली जात असेल तर, ते प्रशासन गोंधळल्याचे द्योतक आहे. व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, उद्योजक, जनसामान्य या सगळ्यांनाच राज्य सरकारच्या आततायीपणाचा त्रास सहन करावा लागत आहे, अशी टीका सहस्रबुद्धे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 2:51 am

Web Title: prakash javadekar requests home minister amit shah to hold state wise review of covid 19 situation zws 70
Next Stories
1 राजस्थानातील घोडेबाजारप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना नोटिसा
2 निओवाईज धूमकेतूचे विलोभनीय दर्शन
3 घराबाहेर पडण्याचे ब्रिटनच्या पंतप्रधानांचे आवाहन
Just Now!
X