News Flash

काँग्रेस नाटक का करतंय?; प्रकाश जावडेकरांनी दिली जाहीरनाम्याची आठवण

"हा दुटप्पीपणा व संधिसाधूपणा"

मोदी सरकारनं कृषि क्षेत्राशी संबंधित तीन विधेयक संसदेत मांडली असून, तीनपैकी दोन विधेयके मंजुर करण्यात आली आहे. या विधेयकावरून विरोधी पक्षांकडून काँग्रेसवर टीका केली जात आहे. काँग्रेसनंही या विधेयकांवरून टीका केली आहे. काँग्रेसच्या टीकेला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उत्तर दिलं आहे. “काँग्रेसला स्वतःच्या जाहीरनाम्याचा विसर आहे. हा दुटप्पीपणा व संधिसाधूपणा आहे,” असं प्रत्युत्तर जावडेकर यांनी दिलं आहे.

कृषीक्षेत्र खुले करणारी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) अशी तीन विधेयके केंद्र सरकारने संसदेत मांडली होती. आंतरराज्यीय शेतीमाल विक्रीला मुभा देणारी, कृषी बाजार समित्यांची एकाधिकारशाही रद्द करणारी व कंत्राटी शेतीला परवानगी देणारी दोन विधेयके लोकसभेत गुरुवारी मंजूर करण्यात आली. जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. ही तिन्ही विधेयके शेतकऱ्यांचे नुकसान करणारी असल्याची टीका होत आहे.

आणखी वाचा- “मोदी सरकारची कृषी विधेयकं शेतकरी विरोधी,” केंद्रीय मंत्र्याने दिला राजीनामा

काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला प्रकाश जावडेकर यांनी उत्तर दिलं आहे. “नव्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांना मुक्ती मिळाली आहे. बाजार समितीत माल विकण्याच्या सक्तीपासून व कंत्राटी शेती न करण्याच्या निर्बंधांपासून.शेतकऱ्यांच्या फायदा हाच या दोन्ही गोष्टींचा उद्देश आहे. यामध्ये बाजार समित्या ( APMC) ही असतील व MSP (किमान आधारभूत किंमत ) देखील असेल, हे सरकारने स्पष्टपणे जाहीर केले आहे. तरीही यावरून काँग्रेस नाटक का करत आहे? काँग्रेसला स्वतःच्या जाहीरनाम्याचा विसर पडला आहे. २०१९ चे जाहीरनाम्यात त्यांनी याच २ गोष्टींचा आश्वासन दिलं होतं आणि आता त्यावरूनच माघार घेत आहे. हा दुटप्पीपणा व संधिसाधूपणा आहे. मोदीजी नेहमीच शेतकऱ्यांचं हित व त्यांचा फायदा कसा होईल, याचा विचार करतात व त्यासाठी काम करतात. त्यामुळे देशातला शेतकरी त्यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे आणि त्यांना नरेंद्र मोदीजींवर पूर्ण विश्वास आहे,” अशी टीका जावडेकर यांनी केली आहे.

आणखी वाचा- राष्ट्रपतींनी स्वीकारला हरसिमरत कौर यांचा राजीनामा; ‘यांच्याकडे’ असेल अतिरिक्त कार्यभार

आणखी वाचा- “मोदीजींचे काही ‘मित्र’ नव्या भारताचे जमीनदार होतील”

राहुल गांधी काय म्हणाले होते?

“मोदीजींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं वचन दिलं होतं. पण मोदी सरकारच्या काळ्या कायदे शेतकरी आणि शेतमजूरांचं आर्थिक शोषण करण्यासाठी केले जात आहेत. हे जमीनदारीचं नवं स्वरूप आहे आणि मोदीजींचे काही मित्र नव्या भारताचे जमीनदार असतील. कृषी बाजार बंद झाला की, देशाची अन्न सुरक्षा संपली,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 11:02 am

Web Title: prakash jawadekar agriculture ordinance modi govt congress rahul gandhi bmh 90
Next Stories
1 Coronavirus: भारतातील रुग्णसंख्येने ओलांडला ५२ लाखांचा टप्पा
2 नवं संकट? चीनमध्ये हजारो लोकांना ब्रुसेलोसिसचा संसर्ग; जाणून घ्या काय आहे हा आजार
3 थाळी वाजवणं, दिवे लावणं यापेक्षा ‘त्यांची’ सुरक्षा महत्त्वाची; राहुल गांधींची सरकारवर टीका
Just Now!
X