सरकारवर खुलेपणाने टीका करणारे आणि समाजातील प्रत्येक गंभीर प्रश्नावर बेधडकपणे आपले मत मांडणारे अभिनेते प्रकाश राज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यामागचे कारण म्हणजे २०१८ मध्ये त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत बोलताना त्यांनी रामलीलाची तुलना ‘चाइल्ड पॉर्न’शी केली. त्यामुळे सोशल मीडियावर त्यावरून वादंग उठले आहे.

फेब्रुवारी २०१८ मध्ये दिलेल्या या मुलाखतीत प्रकाश राज यांनी उत्तर प्रदेश सरकार व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जळजळीत टीका केली. योगी आदित्यनाथ ज्याप्रकारे रामलीला कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार करत आहेत, त्यामुळे अल्पसंख्यांकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी रामलीलाची तुलना ‘चाइल्ड पॉर्न’शी केली. जर लोकांची इच्छा असेल तर उत्तर प्रदेश सरकारने अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजित करु नयेत असा सवाल त्यांना पत्रकाराने केला. यावर उत्तर देताना ‘जर लहान मुले पॉर्न बघत असतील तर तुम्ही त्यांना थांबवणार नाही का,’ असा प्रतिप्रश्न प्रकाश राज यांनी केला.

”समाजासाठी हे धोकादायक आहे. अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम असे कार्यक्रम करतात”, असे म्हणत प्रकाश राज यांनी रामलीला कार्यक्रमाला विरोध दर्शविला. मुलाखतीचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी प्रकाश राज यांना ट्रोल केले आहे.

प्रकाश राज यांनी मोदी आणि भाजपा सरकारवर सोशल मीडियावरून अनेकदा टीका केली. कलाकारांची आणि विचारवंताची समाजात होणाऱ्या गळचेपीवरही त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टिका केली होती. लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला.