कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध
कर्नाटकातील पुरोगामी विचारवंत व लेखक, संशोधक एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदी लेखक उदय प्रकाश यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य प्रदेशातील अन्नुपूर जिल्ह्य़ातील सीतापूर येथून प्रकाश यांनी सांगितले की, कन्नड संशोधक कलबुर्गी यांची हत्या झाल्याने आपल्याला धक्का बसला असून, आपण साहित्य अकादमी पुरस्काराचे मानपत्र व पैसे परत करणार आहोत.
२०१०मध्ये त्यांना मोहन दास या संग्रहासाठी हा पुरस्कार मिळाला होता. लेखक, कलाकार व विवेकवादी विचारवंत यांच्यावर देशात हल्ले होत आहेत. एकीकडे लेखिका तस्लिमा नसरीन यांना व्हिसा देऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोल पिटले जातात, पण दुसरीकडे चित्र वेगळे आहे.
हा निर्णय आपण राजकीय दबावाखाली घेतलेला नाही. लेखकांना सुरक्षा नसते. त्यामुळे त्यांना सहज लक्ष्य केले जाते. कलबुर्गी हे हम्पी विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते व त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांची ३० ऑगस्टला त्यांच्या निवासस्थानी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.