एकेकाळी आपल्या मुलीच्या लग्नासाठी ५०५ कोटींचा खर्च करणारे प्रमोद मित्तल यांना दिवाळखोर घोषित करण्यात आलं आहे. लंडमधील दिवाळखोर आणि कंपनी प्रकरणांसंदर्भातील न्यायालयाने प्रमोद यांनी गुंतवणुकदारांचे पैसे परत करता न आल्याने दिवाळखोर घोषित केलं आहे. मात्र लक्ष्मी मित्तल यांचे बंधू असणाऱ्या प्रमोद यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. २४ हजार कोटींच्या दिवाळखोरीचे प्रकरण ४२ कोटींमध्ये मिटवण्यास गुंतवणुकदारांनी परवानगी दिली आहे. प्रमोद यांनी न्यायालयासमोर कायदेशीर करारानुसार (इंडिव्हिज्युअल व्हॉलेंन्ट्री अँग्रीमेन्ट ज्याला आयव्हीए असंही म्हणतात) 4२ कोटी रुपये परत करण्याची तयारी दर्शवली आहे.

कोणाचे किती कोटी?

मूरगेट इंडस्ट्रीजने दाखल केलेल्या याचिकेनुसार प्रमोद यांना जून महिन्यामध्येच दिवाळखोर घोषित करण्यात आलं. त्यानंतर आता त्यांच्या आयव्हीए आणि पैसे परत करण्याच्या करारासंदर्भात सुनावणी सुरु झाली आहे. प्रमोद हे त्यांच्या क्रेडीटर्सला २४ हजार कोटींचं देणं लागतात. यामध्ये त्यांचा पुतण्या अमित लोहियाचे १६ कोटी, मुलगा दिव्येषचे २३ कोटी आणि वडील मोहन लाल यांचे एक हजार ६३४ कोटी आणि पत्नी संगिताच्या नावे असणाऱ्या दहा कोटींच्या रक्कमेचा समावेश आहे.

शेवटचा पर्याय

प्रमोद यांनी त्यांच्याकडे एक कोटी १० लाखांची संपत्ती असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी आपल्या आयव्हीए पत्रकामध्ये आपल्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून महिन्याचा खर्च एक लाख ९० हजार ते दोन लाख ८० हजारांपर्यंत असल्याचे नमूद केलं आहे. ब्रिटीश कायद्यानुसार आयव्हीएच्या हा कागदोपत्री करार असतो ज्या माध्यमातून एखाद्या देणगीदाराला त्याच्या संपूर्ण किंवा एकूण देयकाच्या काही टक्क्यांचा हिस्सा परत केला जातो. पूर्णपणे दिवाळखोरी जाहीर करण्याऐवजी शक्य तेवढी रक्कम परत करण्यासाठी पैसे घेणाऱ्याला हा शेवटचा पर्याय म्हणून वापरता येतो.
लक्ष्मी मित्तल यांचा मदतीस नकार

प्रमोद यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच प्रमोद यांचे ज्येष्ठ बंदू लक्ष्मी मित्तल यांनी मदत करण्यास नकार दिल्याचेही प्रमोद यांनी म्हटलं आहे.

एक हजार ३३२ कोटींच्या मोबदल्यात २.३९ कोटी अमान्य

प्रमोद यांच्या आयव्हीएला मूरगेट इंडस्ट्रीजने विरोध केला आहे. आयव्हीएसंदर्भात क्रेडीटर्सच्या बैठकीमध्ये मूरगेटने हा प्रस्ताव फेटाळला आहे. मात्र इतर सर्व क्रेडीटर्सने याला मान्यता दिली आहे. मित्तल हे मूरगेटला एक हजार ३३२ कोटी रुपये देणं अपेक्षित आहे. मात्र आयव्हीएअंतर्गत त्यांनी २.३९ कोटी रुपये देण्यास समर्थ असल्याचे म्हटले आहे.

संपत्ती कमी दाखवली

मूरगेटचे निर्देशक असणाऱ्या जॉन सोडेन यांनी मित्तल यांच्या आयव्हीएला दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत न्यायालयामध्ये आवाहन देणार आहेत. “आम्हाला हे पत्रक मान्य नाही आणि मित्तल यांची संपत्ती कमी दाखवण्यात आल्याचे आमचे मत आहे,” असं सोडेन यांनी म्हटलं आहे.

मुलगा करणार मदत

प्रमोद यांना ४२ कोटींची रक्कम परत करण्यासाठी त्यांचा मुलगा दिव्यांश मदत करणार आहे. यासाठी दिव्यांशने ४५ कोटी परत करण्याची तयारी दर्शवली आहे. आता मूरगेटने खोडा घालता नाही तर प्रमोद यांना दिवाळखोर जाहीर करण्याच्या निर्णयाला आवाहन देता येईल.

पत्नीच्या उत्पन्नासंदर्भात माहिती नाही

प्रमोद यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे सहा लाख ७० हजारांचे दागिने, पाच लाख ७० हजारांची तीन महागडी घड्याळे आहेत. ही घड्याळे प्रमोद यांनीच त्यांच्या मुलांना भेट म्हणून दिली होती. तसेच प्रमोद यांनी लंडनमध्ये आपल्याकडे एकही वाहन नसल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये असणाऱ्या आपल्या वाहनाची किंमत एक लाख असल्याचे प्रमोद यांनी संपत्ती जाहीर करताना नमूद केलं आहे. ६२ लाखांचे शेअर्स आणि बँकेमध्ये ३३ लाख रुपये असून या सर्व गोष्टींचा आय़व्हीएमध्ये विचार केला जाणार नाही. “माझी पत्नी उत्पन्नासाठी माझ्यावर अवलंबून नाहीय. आमची बँक खाती वेगवेगळी आङेत. मला तिच्या कमाईसंदर्भात फारशी माहिती नाही,” असं प्रमोद यांनी म्हटलं आहे.